दैव तारी त्याला… लोकलमधून पाय घसरून वैतरणा नदीत पडला तरुण; स्थानिकांनी वाचवले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मंगळवारी रात्री थरारक प्रसंग घडला. डहाणूच्या दिशेने धावणाऱ्या लोकलमधून एका तरुणाचा तोल जाऊन तो थेट वैतरणा खाडीच्या खोल पाण्यात कोसळला. काही क्षण मृत्यू समोर उभा राहिलेल्या या तरुणाला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी प्रयत्नांमुळे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्यान वांगड (रा. बोईसर) हा तरुण रात्री लोकलने घरी परतत होता. ट्रेन वैतरणा खाडीवरील पुलावरून वेगाने जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो धावत्या गाडीतून खाली पडला. अंधार, वेगवान प्रवाह आणि अथांग पाणी यामुळे त्याची घालमेल झाली.

खाडीत पडूनही उद्यानने प्रसंगावधान राखत पुलाच्या पिलरचा आधार घेतला. प्रवाहाशी झुंज देत तो तिथेच थांबून राहिला. हा प्रकार काही स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी हालचाल केली.

स्थानिक नागरिकांनी बोट पाण्यात उतरवून पिलरजवळ अडकलेल्या उद्यानपर्यंत पोहोचत त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, उद्यानची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत.