
दूषित पाण्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याने पाणीपुरवठा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एक नागरिक टॉवरवर चढला आहे. वैभव डहाणे असे या नागरिकाचे नाव आहे. सदर मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस या कंपनीविरोधात डहाणे यांनी वीरु स्टाईल आंदोलन पुकारले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील पूर्वेश वांढरे या मुलाचा 5 जुलै रोजी दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला होता. या मृत्यूला विदर्भ मल्टी सर्व्हिसेस ही कंत्राटदार कंपनी कारणीभूत आहे. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पूर्वेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी वैभव डहाणे हे तहसील कार्यालयातील टॉवरवर चढले आहेत.
डहाणे यांची भर पावसात ही वीरुगिरी सुरू असून मागण्या मंजूर झाल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा इशारा वैभव यांनी दिला आहे. दरम्यान, डहाणे यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. डहाणे यांना टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.