
समृद्धी महामार्गावर एक भयंकर घटना घडली. यामार्गाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची चाकू आणि बंदुकीच्या जोरावर 30 हजार रुपयांची रोकड आणि इतर ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पाच जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2 नोव्हेंबर रोजी नागपूर-मुंबई मार्गिकेवर कल्याण तालुक्यात घडली. पुणे येथील रहिवासी असलेले 55 वर्षीय खान अब्दुल फरीद आणि अब्दुल हमीद हे आपल्या कारमधून छत्रपती संभाजीनगरहून कळव्याच्या (ठाणे) जात होते. यावेळी एका दुसऱ्या कारने त्यांचा रस्ता अडवून त्यांना थांबवले.
पाच अज्ञात दरोडेखोरांनी दोघांनाही चाकू व बंदुकीचा धाक दाखवून 30 हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन लुटले. एवढेच नव्हे तर, दरोडेखोरांनी काही वेळ चालकालाही कारमध्येच बंधक बनवून ठेवले होते, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.
या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी छत्रपती संभाजीनगरमधील मूळ गावी पळून गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने तपासाचा वेग वाढवला आणि पाचही जणांना मंगळवारी अटक केली आहे.


























































