>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी एल्गार पुकारत धाब्याला आग लावली. तसेच धाबा चालक व धाब्यातील एका सहका-याला चांगलाच धु धु धुतला यवतमाळ जिल्ह्यातील वणी-घुग्घुस रोडवर निलगिरी बन जवळ ही घटना घडली. प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्याने वणी तालुक्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहिती नुसार, यवतमाळ जिल्ह्यातील वणी घुग्घुस हायवेवर निलगिरी बनाजवळ ‘बाबूभैया का धाबा’ नामक धाबा आहे. या धाब्यावरून राजरोसपणे दारूची अवैध रित्या विक्री सुरु होती . गावातील अनेक तरुण मुलं दारूच्या आहारी गेले. याबाबत महिलांनी अनेकदा धाबा मालकाला समज दिली. मात्र धाबा मालकाने याकडे साफ दुर्लक्ष केले. तीन दिवसांपूर्वी मंदर येथील महिलांनी याबाबत प्रशासनाला तक्रार पण दिली होती . त्यानंतर महिलांनी या धाब्यावर कारवाईची वाट पण पाहिली. मात्र यावर कोणतीही सुस्त प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त महिला एकत्र आल्यात. सुमारे 30 ते 40 महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केला. त्यांनी धाब्याची तपासणी करत लपवून ठेवलेल्या दारू,च्या शिष्या पाणी,कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स बाहेर काढून रस्त्यावर ठेवल्या आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला.संतप्त महिला एवढ्यावरच थांबल्या नाही. त्यांनी ढाबा चालक व धाब्यातील एका सहका-याला चांगलेच धुतले . त्यानंतर संतप्त महिलांनी धाब्याला आग लावली. या आगीत धाब्यातील पाण्याची टाकी, काउंटर टेबल, ग्रीन शेड, बल्ली इ. वस्तू जळाल्या. सोबत धाब्यात असलेले भांडे, रॅक, खुर्ची, टेबल इत्यादींची नासधूस केली. स्वतः महिलांनी वणी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलांनी दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.हा धाबा हायवेवर आले. त्यामुळे घटनेच्या वेळी ये-जा करणा-या बघ्यांची येथे चांगलीच गर्दी झाली होती. यावर सध्या पोलिसांतर्फे तक्रार नोंदवणे सुरु आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजरोसपणे अवैधरित्या सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.