विशेष – सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा

>> मंगला पुरंदरे

बहुसंख्य हिंदूंना संघटित करून त्यांचे भावनिक ऐक्य टिकविण्याच्या हेतूने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारी ठरली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पार बदलून गेले. पण दहा दिवस लोक जात-पात विसरून उत्सव साजरा करतात. टिळकांनी ज्या उद्देशांनी सार्वजनिक उत्सव सुरू केला तो म्हणजे जात-पात विसरून सर्व हिंदूंनी एकत्र यावे. तो उद्देश प्रत्यक्षात येत आहे असे म्हणायला वाव आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव 1893 मध्ये सुरू केला, परंतु ऋग्वेदात गणपती सुक्त म्हणून मानली जाणारी ऋचा आहे, अथर्वशीर्षात गणपती अथर्वशीर्ष आहे. श्री गणेशाचे उपासक सर्वत्र होते. पुरातन काळापासून कोणत्याही देव-देवतांच्या पूजेला सुरुवात करण्याआधी गणेश पूजेची प्रथा होतीच, आजही आहे. पेशवे काळात गणेशोत्सवाला थोडेफार सार्वजनिक स्वरूप आले. 1818 मध्ये पेशव्यांचे (मराठय़ांचे) राज्य गेले, ब्रिटिशांनी पेशव्यांच्या ताब्यात असलेल्या महत्त्वाच्या, मोठय़ा वास्तू जप्त केल्या. त्यापैकी एका वस्तूत संपूर्ण सोन्याची गणेशमूर्ती होती. या मूर्तीच्या सर्वांगावर हिरे होते आणि मूर्तीचे डोळे माणकाचे होते. 1819 साली या मूर्तीची किंमत पन्नास हजार स्टर्लिंग पाऊंड ठरवली गेली होती, असा उल्लेख पांडुरंग हरी या विल्यम होक्ली यांच्या कादंबरीत येतो.

याचसंदर्भात एक गोष्ट सांगावीशी वाटते. विरारजवळील चंदनसार या लहानशा गावात तेराव्या शतकात बिंब राजाने आपल्याबरोबर आणलेल्या देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणांच्या 36 कुटुंबांपैकी पाध्ये पाटील कुटुंब राहत होते, आज त्यांची अकरावी पिढी तिथे आहे. राजाने बरोबर आणलेल्या सर्वच छत्तीस कुटुंबांना जमीनजुमला, गुरेढोरे असे सर्व दिले होते. पाध्ये -पाटील कुटुंबाला चंदनसार येथे जमीन आणि दुभती जनावरे दिली होती. या कुटुंबाची खूप भरभराट झाली. त्यांच्या चौथ्या पिढीतील विश्वनाथ हे पोलीस पाटीलकी आणि वतनदारी सांभाळून पंपोशीतील लोकांना मदत करीत. दुर्दैवाने त्यांना अपत्य नव्हते. 1825 साली इंग्रजी सरकारच्या नियमानुसार वतनदारांना वारस नोंदणी करावी लागे. अशा परिस्थितीत एका हितचिंतकाने त्यांना गणपतीस नवस करण्यास सांगितले. मुलगा झाल्यास तुझी स्थापना करीन असा नवस बोलला गेला. दहा दिवस उत्सव साजरा करू असेही सांगितले. गजाननाने प्रार्थना स्वीकारली. 1826 च्या सुरुवातीला विश्वानाथांना पुत्र प्राप्ती झाली. पाध्ये पाटील घराण्याला दाजींच्या रूपात वारस मिळाला. विश्वनाथांनी 7 सप्टेंबर 1826 रोजी धुमधडाक्यात श्रींची स्थापना केली आणि दहा दिवस उत्साहाने सर्व नातेवाईकांना आमंत्रित करून गणपती उत्सव साजरा केला. त्या वर्षापासून आतापर्यंत म्हणजे 200 वर्षे या कुटुंबात गणपती बाप्पाचे दहा दिवस अतिशय उत्साहाने पूजन होते. या बाप्पाला घरातल्या वडील सदस्य समजून त्याचे त्या वर्षी विसर्जन केले जात नाही. बाराही महिने गणपती घरातच राहतो. दरवर्षी नव्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात व दहाव्या दिवशी आदल्या वर्षीचा गणेश विसर्जित करतात. पाध्ये पाटील कुटुंब आपल्या या उत्सवाला सार्वजनिक होऊ देत नाहीत, कुटुंबापुरते मर्यादित ठेवतात.

याचप्रमाणे भाईंदर येथे राहत असलेले नाईक कुटुंबसुद्धा जवळजवळ 220 वर्षांपासून बाळगणेश आणतात. दोन बाळगणेश असतात, एक नवीन आणलेला व दुसरा आदल्या वर्षीचा. नव्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात व दहाव्या दिवशी आदल्या वर्षीचा गणेश विसर्जित करतात. दहा दिवस प्रत्येक दिवशी त्या त्या दिवसाच्या देवाचा अभिषेक, एकादशणी आणि विसर्जनाच्या आदल्या रात्री, जागरण, सर्व देवांच्या आरत्या अत्यंत तलासुरावर गायल्या जातात. वे.शा.सं. वसंत महादेव पुरंदरे, दिवाकर पांडुरंग नाईक, दीनानाथ रामचंद्र नाईक इत्यादी विद्वानांचे मार्गदर्शन होत असे.

पेशव्यांनी पुण्यात गणपती पूजेला सार्वजनिक स्वरूप दिले, परंतु गणेश स्थापना वाडय़ातच होती, वाडय़ाबाहेर नव्हती. पेशव्यांचे अनुकरण बडोदे व ग्वाल्हेर सरकारांनी केले आणि ते मात्र खऱया अर्थाने सार्वजनिक स्वरूपाचे होते. 1892 साली टिळक जेव्हा ग्वाल्हेरला गेले होते, तेव्हा त्यांनी या उत्सवाचा दरबारी थाट पहिला तेव्हा त्यांना सार्वजनिक गणेश उत्सवाची कल्पना सुचली. त्यांनी अनेक ठिकाणी याविषयी निरोप पाठविले, पण ते नीट आवश्यक वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे फार थोडय़ा ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव झाले. पुण्यात फक्त तीन आणि मुंबईत फक्त एक तो म्हणजे केशवजी नाईकांच्या चाळीत.

या मागे असे कारण असावे की सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व लोकांना नीट समजले नसावे, परंतु 1894 चा गणेश उत्सव जोमाने संपन्न झाला. 1893 च्या गणेश उत्सवानंतर टिळकांनी ’केसरी’तून अग्रलेख लिहिले. लोकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले. याचा परिणाम असा झाला की 1894 चा गणेशोत्सव अतिशय जोमाने सर्व महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. बहुसंख्य हिंदूंना संघटित करून त्यांचे भावनिक ऐक्य टिकविण्याच्या हेतूने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारी ठरली. या उत्सवात व्याख्याने, सभा, मिरवणुकी, मेळे, आख्याने, कथा कीर्तने यांची रेलचेल असे. गावोगावी उत्सव मंडळे स्थापन झाली. मुंबई शहर यात मागे नव्हते. मुंबईतील अनेक ठिकाणी उत्सव मंडळे स्थापन झाली. मुंबईतील जिंतीकर चाळ, हिराबाग, माधवबाग (कावसजी पटेल त्यांक) गिरगावातील गंगाराम खत्री चाळ, शांतारामाची चाळ, फणसवाडीतील जगन्नाथाची चाळ, पारशी अग्यारी लेनमधील श्रीकृष्ण लॉज, गोरेगावकर चाळ, दादरमध्ये खांडके बिल्डिंग, परळमधील दामोदर हॉल आणि कामगार मैदान ही गणपती उत्सवाची प्रमुख केंद्रे बनली. मुंबईत गणपती उत्सवाचे वारे वाहत होते त्याचा परिणाम गिरगावातील विठ्ठलभाई पटेल रोडवरील सदानंद वाडीतही उमटले. 1927 च्या सुमारास या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. 1951 मध्ये या गणेशोत्सवाचा रौप्य महोत्सव साजरा झाला. 1976 मध्ये सुवर्ण महोत्सव धूमधडाक्यात साजरा केला गेला. नंतर वाडीतील गणेशोत्सव कमी प्रमाणात होऊ लागला.अर्थात गेल्या काही वर्षांत लालबागचा गणपती, खेतवाडीचा गणपती, चिंचपोकळीचा गणपती, माटुंग्याचा सरस्वत मंडळींचा गणपती अशा अनेक सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र ख्याती पसरली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पार बदलून गेले. अगदी म्हणायचे तर समईचा शांत प्रकाश जाऊन विजेच्या दिव्यांची आरास सुरू झाली. गणपतीसमोरचे देखावे समकालीन होऊ लागले.

टिळकांच्या काळात आधी उल्लेख केल्याप्रमाणे गणेशोत्सव म्हणजे ताबुताची नक्कल अशी टीका होत असे. हल्ली गणेशोत्सवाच्या मूर्तीपासून, मंडप, लाऊडस्पीकर, वाद्य या सर्वांवर टीका होते, पण दोन्ही काळात दहा दिवस लोक जात-पात विसरून उत्सव साजरा करतात. मुंबईत राहणारी इतर राज्यांतील लोकही दहा दिवस गणेशोत्सव घरी गणपती आणून साजरा करतात. मुंबईचा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशात स्थायिक झालेले भारतीयही सार्वजनिक आणि खासगीरीत्या गणेशोत्सव साजरा करतात. टिळकांनी ज्या उद्देशांनी सार्वजनिक उत्सव सुरू केला तो म्हणजे जात-पात विसरून सर्व हिंदूंनी एकत्र यावे. तो उद्देश प्रत्यक्षात येत आहे असे म्हणायला वाव आहे.