मंगेश काळोखे हत्याकांड- आठ जणांना अटक; आरोपी बाप-बेट्यांना नागोठण्यातून उचलले

खोपोलीतील शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडातील आठ आरोपींना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन या दोघांना पोलिसांनी नागोठण्यातून उचलले. या सर्वांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.

मानसी काळोखे यांच्या निवडणूक प्रचारात काही राजकीय वाद झाले होते. मात्र नंतर प्रकरण शांत झाले. या निवडणुकीत मानसी काळोखे या विजयी झाल्या. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात शुक्रवारी त्यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाली.

या हत्येनंतर काळोखे यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर आणि अन्य पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला. यातील सुधाकर घारे यांनी तातडीने एक व्हिडीओ जारी करून या हत्याकांडाशी त्यांचा काडीमात्र संबंध नसल्याचे जाहीर केले.

आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन हा नागोठण्याजवळ पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना आज सकाळी अटक केली. त्यानंतर संध्याकाळी एकूण आठ आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सर्वांची कसून चौकशी सुरू असून त्यातून सत्य बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले.