<<< मंगेश वरवडेकर
शनिवारी ऑलिम्पिक स्टेडियममध्ये न्यूझीलंडच्या हॅमिश करचं उंच उडीतलं सुवर्ण पाहून रडावं की हसावं, काहीच कळत नव्हतं. त्याची कामगिरी पाहून त्याचं अभिनंदन करायला, त्याला अभिवादन करायला हजारो चाहत्यांप्रमाणे मीसुद्धा उठून उभा राहिलो. ते न्यूझीलंडचे पॅरिस ऑलिम्पिकमधलं चक्क नववं सुवर्ण होतं. अवघी 54 लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडने 18 पदके जिंकली. आणि आमचा 140 कोटी लोकसंख्येचा देश. आपल्या खेळाडूंना काय म्हणावे कळतच नव्हते!
ऑलिम्पिकमध्ये न्यूझीलंड आणि नेदरलॅण्ड्स या छोट्या देशांचं यश पाहून मन पुन्हा एकदा सुन्न झालं. त्यांचे अॅथलीट ‘नक्की कौनसी चक्की का आटा खाते है…?’ हा प्रश्न मनात आला. येणारच ना. ऑलिम्पिकमध्ये युरोपातल्या छोट्या-छोट्या देशांची कामगिरी नेहमीच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायक असते. पण युरोपबाहेर असलेल्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचं नेहमीच कौतुक वाटतं. या दोन शेजारी देशांनी मिळून 27 सुवर्ण जिंकलीत. एकूण पदके 68. या दोन देशांची लोकसंख्या आपल्या महामुंबईपेक्षा खूपच कमीय. फक्त सव्वातीन कोटी लोकसंख्या आहे या दोन्ही देशांची.
जगाच्या पाठीवर कोणतीही टेक्नॉलॉजी आली तर ती दुसऱ्या सेकंदाला आपल्या हिंदुस्थानात पोहोचते. मग हे कोणत्या पद्धतीने खेळाडूंना घडवतात? खेळाडू घडवण्याचा, ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा कोणता कारखाना त्यांच्याजवळ आहे? हे आपल्याला हिंदुस्थानात का उभारता येत नाहीय? मनात असंख्य विचार आले आणि माझा राग अनावर झाला. त्यांच्यात आणि आपल्यात इतका काय फरक आहे? गेली 20 वर्षे आपल्या इथे खेळांवर-खेळाडूंवर खूप मेहनत घेतली जातेय. सरकारही पाण्यासारखा पैसा खर्च करतेय. खेळाडूही प्रचंड मेहनत करताहेत. तरीही रिझल्ट का दिसत नाहीय? आपले दिग्गज याचा कधी विचार करणार की नाहीत?
ऑलिम्पिकमध्ये आपली होणारी मानहानी पाहावत नाहीय. आपण महासत्ता होतोय, असे ढोल वाजवले जात आहेत. पण खेळाच्या कुंभमेळ्यात आपली कामगिरी पाहून वाटतं, तांब्याभर पाणी घेऊन त्यात जीव द्यायला हवा? किती दिवस, किती वर्षे आपली कामगिरी अशीच होत राहणार? याचा कुठेतरी अंत असायला हवा. आपल्या देशात प्रचंड गुणवत्ता आहे. ती आपल्या राजकारणाच्या ओझ्याखाली नेहमीच दबली जाते, दाबली जाते. जोपर्यंत राजकारण होत राहणार, आपली ऑलिम्पिकमध्ये अशीच मानहानी होत राहणार. यापासून पुणीही वाचवू शकत नाही का? ऑलिम्पिकमध्ये कधी आपण ताठ मानेने आपल्या राष्ट्रगीताचे सूर ऐकायला उभे राहणार? तो क्षण येणार की नाही?
चार दिवसांपूर्वी सेंट ल्युसियाच्या ज्युलियन आल्फ्रेडने महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण जिंकले. 200 मीटर शर्यतीत तिचे सुवर्ण थोडक्यात हुकले. पॅरेबियन बेटांवर असलेल्या या देशाची लोकसंख्या अवघी 1 लाख 84 हजार आहे. म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या एका वॉर्डाइतकी. डॉमिनिका हा देश तर 68 हजार लोकसंख्येचाच. तरीही या देशाने सुवर्ण जिंकलेय. हे छोटे-छोटे देश-बेट आपल्या देशात सुईसुद्धा बनवत नाहीत; पण पदक विजेते खेळाडू मात्र खोऱ्याने घडवताहेत. आणि आम्ही जगातली कोणतीही गोष्ट येऊ द्या. दुसऱ्या दिवशी त्यांची कॉपी बनवतो. पण ते ऑलिम्पिकमध्ये मिळवत असलेल्या यशाच्या जवळपासही आपल्याला जाता येत नाहीय. हे दुर्दैव असू शकत नाही. हे आपल्या कर्मदरिद्री राजकारणाचे फळ आहे. आणखी एक महाभयंकर आकडा माझ्यासमोर आलाय.
अमेरिका आणि चीन या दोन देशांना वगळल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवणाऱ्या सर्व देशांची लोकसंख्याही आपल्या महाकाय देशापेक्षा कमी आहे. हंगेरी, स्वीडन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ब्रिटन, ग्रीस, इटली, दक्षिण कोरिया, जर्मनी, उझबेकिस्तान, पोलंड, तुर्कस्तान यासारख्या अनेक देशांची लोकसंख्या तर आपल्या राज्यांच्या लोकसंख्येपेक्षाही खूप कमी आहे. एक कोटी लोकसंख्या नसलेल्या अनेक देशांनीही आपल्यापेक्षा अधिक पदके जिंकली. त्यात सुवर्ण पदकेही आहेत. एकूण 62 देशांनी सुवर्ण पदके जिंकलीत. त्यात आपण नाही. दुःख तर होणारच. पण ते दुःख कमी करण्यासाठी तमाम हिंदुस्थानींनी क्रीडा जगतात पेटून उठायला हवे. खेळात होणारे राजकारण पेटवून टाकायला हवे.
माझी सर्व क्रीडा पंडितांना विनंती आहे, अमेरिका-चीनचे सोडा, ते न्यूझीलंड-नेदरलॅण्ड्सवाले काय करतात ते तरी पाहून या… टोकियोत 7 पदके जिंकल्यावर या वेळी दहा-पंधरा पदके जिंकण्याच्या अविर्भात आपण पॅरिस गाठलं. पण आपण अक्षरशः उताणे पडलोय. निम्मी पदकेही जिंकता आलेली नाहीत. उलट एक पाऊल मागे पडलेय. आता पुन्हा नव्याने झेप घेण्यासाठी ते मागे पडलेले एक पाऊल महत्त्वाचे ठरू द्या. जे पॅरिसमध्ये करता आलं नाही ते लॉस एंजिल्समध्ये करण्यासाठी आतापासूनच कामाला लागू या.