
यंदा हवामानाच्या लहरीपणामुळे आंब्याचा बराचसा मोहोर गळून गेला. त्यामुळे कोकणासह अनेक भागांतील आंब्याचे पीक वाया गेले. एप्रिल उजाडल्यानंतरही बाजारात आंब्याची आवक फारशी दिसून आलेली नाही. याचा फायदा घेऊन काही व्यापारी रसायनांचा वापर करून आंबा पिकवत आहेत. हा आरोग्यास घातक असलेला आंबा अनेक ठिकाणी विक्रीस येत आहे. हैदराबादमध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबवत रसायनांचा वापर करून पिकवलेला 200 किलो आंबा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आंध्र प्रदेशातील एका घाऊक फळ व्यापाऱ्याला अटक केली. कॅल्शिअम कार्बाईडसारख्या विषारी रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचे तपासात दिसून आले.
खाद्य सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे शहराच्या विविध भागांत छापे टाकले. चुडी बाजार येथे फळांचा व्यापार करणाऱ्या एकाने आंबे पिकवण्यासाठी डायमंड रायप इथिलिनचा वापर केल्याचे आढळून आले आहे. हैदराबाद अन्न भेसळ दक्षता पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्यापारी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पिकवणारे रसायन वापरत होता. फळे पिकवणाऱ्या रसायनाची दोन डझनांहून अधिकची पाकिटे आम्ही जप्त केली आहेत. तसेच पोलिसांनी शहरातील विविध गोदामांमधून साधारण सात टन आंबे जप्त केले आहेत. हे आंबे इथिलीन आणि कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी काही गोदामांत त्याची साठवणूक केली जाते. हे गोदाम, किरकोळ विव्रेते यांच्या दुकानांवर देखरेख ठेवण्यात येत आहे, अशी माहिती हैदराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली.
आरोग्याला धोका
डॉक्टरांच्या मते, कॅल्शिअम कार्बाइडने पिकवलेले आंबे खाल्ल्याने घसा खवखवणे, पोटात दुखणे, उलटय़ा-जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा फळांचे सेवन केल्यास श्वसनाचा त्रास होऊ शकतो.



























































