रोबोट करणार मॅनहोलची सफाई! चेंबूरमध्ये काम सुरू

504

मुंबईतील मॅनहोलची सफाई आता रोबोटिक मशीनकडून करण्यात येणार आहे. सफाई कामगारांची सुरक्षा आणि दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवाय पाणी तुंबण्याची समस्याही कमी होणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात आज चेंबूरमध्ये करण्यात आली.

सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या जलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी ठिकठिकाणी मॅनहोल (मनुष्य प्रवेशिका) ठेवण्यात आल्या आहेत. मात्र हे मॅनहोल उघडे राहिल्यास जीवितहानी होण्याचा धोका असतो. ऑगस्ट 2017 साली झालेल्या अतिवृष्टीत पोटविकारतज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील मॅनहोलवर जाळ्या बसवण्यात येत आहेत. मात्र या मॅनहोलची सफाई करण्यासाठी कामगारांना आत उतरून सफाई करावी लागते. अशा वेळी दुर्घटना घडण्याचा धोका असतो. त्यामुळे मॅनहोलची सफाई रोबोटिक मशीनच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मुंबई रिफायनरीने पालिकेला हे दोन रोबोट दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ‘एम-वेस्ट’ सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान,  बीपीसीएलचे सी. जे. ल्येर, आर. आर. नायर आदी उपस्थित होते. या रोबोटिक मशीनला दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार काम केले जाणार आहे.  केलेल्या कामाची माहिती मशीनवर दिसणार असल्यामुळे कामही योग्यरीत्या करता येणार आहे.

100 फूट खोल जाऊन सफाई करणार

सफाई कामगारांना मॅनहोलमध्ये प्रत्यक्ष उतरून सफाई करावी लागते. मात्र मॅनहोलमध्ये असणारा मिथेन, हायड्रोजन सल्फाईड असे घातक वायू आणि जीवघेण्या दूषित घटकांमुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. कामगारांना त्वचारोगांसह श्वसनाच्या विकाराचा शिवाय मॅनहोलमध्ये गुदमरण्याचाही धोका असतो. या पार्श्वभूमीवर सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही रोबोटिक मशीन मॅनहोलमध्ये तब्बल 100 फुटांपर्यंत खाली जाऊन काम करणार आहे. या उपक्रमाच्या यशानंतर आगामी काळात संपूर्ण मुंबईत आवश्यक त्या प्रमाणात रोबोटच्या माध्यमातून मॅनहोलची सफाई करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या