
मणिपूरमध्ये बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी संशयित कुकी अतिरेक्यांनी बॉम्ब हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला, तर त्यांची आई जखमी झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पीटीआय या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित अतिरेक्यांनी डागलेला एक बॉम्ब ‘मोइरांग ट्रोंगलाओबी’ येथील एका नागरिकाच्या घरावर पडला. या हल्ल्यात ५ वर्षांचा मुलगा आणि सहा महिन्यांची मुलगी यांचा मृत्यू झाला. घरात बॉम्बचा स्फोट झाला, त्यावेळी हे तिघेही त्यांच्या शयनकक्षात झोपलेले होते.




























































