राज्यात मराठा, दलित आणि मुस्लिम समाजावर सर्वाधिक अन्याय होत आहे. हा अन्याय रोखण्यासाठी या समाजांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे झाले तर राज्यात अशक्य ते शक्य होईल, असे प्रतिपादन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मिटमिटा परिसरातील डोंगरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ‘ऊर्जाभूमी’ उभारली जात आहे. या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संभाजी भगत, प्रा. चंद्रकांत भराट, रखमाजी जाधव, कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे, शिवसेनेचे पश्चिम विधाससभाप्रमुख राजू शिंदे, प्रा. सुनील मगरे उपस्थितीत होते.
ऊर्जाभूमी परिसरात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभात मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ‘मशाल’ पेटविण्यात आली. ही मशाल हाती घेऊन स्मारकाचे संकल्पक चेतन कांबळे यांनी उपस्थितांना दाखविली.