दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मनोज तिवारी यांची उचलबांगडी, छत्तीसगड, मणिपूरचे प्रदेशाध्यक्षही बदलले

2499

खासदार मनोज तिवारी यांची अखेर दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी उत्तर दिल्लीचे महापौर आदेश गुप्ता यांच्याकडे देण्यात आली आहे. छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांनाही हटवण्यात आले असून, त्यांच्याजागी विष्णुदेव साय यांना आणण्यात आले आहे तर मणिपूरमध्येही भावनानंद सिंह यांच्याकडील जबाबदारी काढून ती एस. टिकेंद्र सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभेत लाजिरवाणा पराभव झाल्यापासून प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उचलबांगडीची मागणी होत होती. तिवारी हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. दिल्ली विधानसभेत भाजप पराभवाच्या गर्तेत असतानाही मनोज तिवारी यांनी विजयाच्या गमज्या मारल्या होत्या. पराभवानंतर तिवारी यांनी राजीनामा देऊ केला होता. मात्र पक्षाने तो फेटाळला. मात्र आता मनोज तिवारी यांना हटवून आदेश गुप्ता यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुप्ता हे संघपरिवाराच्या निकटचे असून, मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

छत्तीसगडमध्येही प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांच्या कार्यशैलीवर कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे त्यांना हटवून विष्णुदेव साय यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. मणिपूरमध्येही भावनानंद सिंह यांना बाजूला करण्यात आले असून, त्यांच्या जागी एस. टिवेंâद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या