मंत्रालय हादरले! दुसऱ्या मजल्यावरून दोन शिक्षकांनी उडय़ा मारल्या

1583

राज्यातल्या दिव्यांगांच्या 300 शाळांना तातडीने अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयात आलेल्या हेमंत पाटील आणि अरुण नेटारे या दोन शिक्षकांनी आज मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने मंत्रालयात जाळ्या लावलेल्या असल्याने ते थेट त्या जाळ्यांमध्ये अडकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलीसही चांगलेच गोंधळून गेले. अखेर पोलिसांनी 20 आंदोलकांना ताब्यात घेतले. शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले, पण तरीही मागण्या मान्य झाल्यामुळे संपूर्ण राज्यातील दिव्यांग शाळांचे संचालक व शिक्षक दुपारी मंत्रालयात आले होते. हे आंदोलक ठिकठिकाणी विखुरले होते. पण अचानक सायंकाळी 5.30च्या सुमारास हेमंत पाटील व अरुण नेटारे हे दोघे आंदोलक दुसऱ्या मजल्यावर गेले आणि खाली उडय़ा मारल्या. मंत्रालयात काही वर्षांपूर्वी पॅरोलवर सुटलेल्या एका आरोपींने मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मजबूत जाळ्या लावल्या आहेत.

दिव्यांग विकास परिषद व इतर दोन-तीन संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलकापैकी कोंडीबा बंडे, माणिक करे म्हणाले की, सामाजिक न्यायमंत्री सुरेखा खाडे यांच्यासोबत बैठक झाली. या शाळांना अनुदान देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर दोन दिवसांनी राज्यातल्या फक्त तीन-चार शाळांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला, पण इतर शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या असल्यामुळे शिक्षक व संस्था चालकांवर आंदोलनाची वेळ आली, असे ते म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 20 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

15 वर्षांपासून अनुदान नाही 

राज्यातील दिव्यांग मुलांच्या सुमारे 300 शाळा आहेत. यातील प्रत्येक शाळेत सरासरी 40 ते 50 दिव्यांग मुला-मुलींचा सांभाळ होतो, पण मागील 15 वर्षांपासून या शाळांना सरकारी अनुदान मिळालेले नसल्यामुळे या शाळा चालवणे मुश्कील होत आहे. या शाळांना तातडीने अनुदान सुरू करण्याच्या मागणीसाठी या शाळांच्या संचालकांचे व शिक्षकांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते.

अशी उडाली धावपळ

  • हेमंत पाटील आणि अरुण नेटारे दोघेही जाळीवर बसून घोषणाही देत होते. त्यांनी मागणी पत्रके वरून खाली भिरकावली. या प्रकाराने बंदोबस्तावरील पोलिसांची धावपळ उडाली.
  • दोघे पोलीस जाळीवर उतरले आणि दोघांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न करू लागले, पण दोघा आंदोलकांनी जाळी घट्ट पकडून ठेवली असल्यामुळे त्यांना बाहेर काढता येत नव्हते.
  • अखेर पोलिसांनी मोठय़ा प्रयासाने या दोघांना बाहेर काढले. तोपर्यंत मंत्रालयाच्या तळमजल्यापासून वरच्या मजल्यावर आंदोलक घुसले होते.
  • ‘अनुदान मिळालेच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यामुळे संपूर्ण मंत्रालयात गदारोळ झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या