जिल्ह्यात बंडोबांमुळे महायुतीला भगदाड; मंचरमध्ये 15, सासवडमध्ये 26 तर भोरमध्ये 11 जणांची माघार

मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग १ मधून वंदना कैलास बाणखेले या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाली असून, केवळ १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. नगराध्यक्षपदासाठी 6, तर 16 प्रभागांमध्ये ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुतीला भगदाड पडल्याची स्थिती आहे.

प्रथमच स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग 1 मधून अपेक्षेप्रमाणे माजी खासदार किसनराव बाणखेले यांची सून वंदना कैलास बाणखेले बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना मिंधे गटाच्या उमेदवार शिल्पा अमोल काजळे यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, आज माघारीच्या दिवशी फक्त 15 उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. शिवसेना मिंधे गटाच्या तालुका महिला अध्यक्ष जागृती किरण महाजन यांनी प्रभाग 9 मधून माघार घेतली. मात्र, त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज कायम ठेवल्याने शिवसेना मिंधे गटात बंडखोरी झाली आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांची सून प्राची यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीच्या मोनिका सुनील बाणखेले, मिंधे गटाच्या राजश्री दत्तात्रय गांजाळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रजनीगंधा राजाराम बाणखेले, काँग्रेसच्या फरजीन इकबाल मुलांनी व अपक्ष जागृती किरण महाजन, प्राची आकाश थोरात यांच्यामध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक २,३,५,६,१०,१२,१४,१६ या 8 प्रभागांतून एकही माघार झालेली नाही. प्रभाग ४ मधून अजिंक्य आनंद थोरात व अतीश अशोक थोरात यांनी माघार घेतल्याने ३ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ७ मधून अनिकेत शिवाजी देठे यांनी माघार घेतल्याने 7 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 8 मधून शेख मन्सूर मोहम्मद, श्याम शांताराम थोरात, कुमेल इनामदार यांनी माघार घेतल्याने 6 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभात 9 मधून जागृती किरण महाजन व अरशिया कुमेल इनामदार यांनी माघार घेतली. तेथे 4 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 11 मधून परशुराम ज्ञानेश्वर भेके यांनी माघार घेतल्यानंतर 3 उमेदवार रिंगणात राहिले. प्रभाग 13 मधून सुप्रिया ज्ञानेश्वर लोखंडे व तनजीला फरीद इनामदार यांनी माघार घेतल्यानंतर 4 उमेदवार रिंगणात राहिले, तर प्रभाग 15 मधून रूपाली इंद्रजीत दैने यांनी माघार घेतली. येथे ४ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १७मधून अर्चना शिवाजी थोरात व तृप्ती धनेश थोरात यांनी माघार घेतल्यानंतर ३ उमेदवार रिंगणात आहेत. कल्पेश आप्पा बाणखेले प्रभाग 10 मधून अपक्ष रिंगणात आहे. प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विकास बाणखेले यांची पत्नी सोनाली अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.

सासवडमध्ये २६ जणांची माघार सासवड :

सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सहापैकी दोनजणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे, तर नगरसेवकसाठी 71 पैकी 24 जणांनी अर्ज माघारी घेतले असून, आता २२ जागांसाठी ४७ जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वामन जगताप, गणेश जगताप यांनी माघार घेतल्याने घड्याळ चिन्ह गायब झाल्याची चर्चा रंगली आहे.

भोरमध्ये ११ जणांचे अर्ज माघार

भोर : भोरमध्ये 2 नगराध्यक्ष, तर 9 नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतला आहे. यामुळे नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 2, तर 20 नगरसेवक जागेसाठी 52 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे संजय जगताप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामचंद्र आवारे, शिवसेनेचे नितीन सोनवले व अपक्ष कविता खोपडे हे 4 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात होते. परंतु, नितीन सोनवले व कविता खोपडे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे व भाजपचे संजय जगताप यांच्यात लढत होणार आहे.