
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये अनधिकृत गॅस गोदामात स्फोट होऊन दोन मुलांसह अनेक जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तात्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
दुबग्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका घरामध्ये बेकायदेशीररित्या गॅस गोदाम करण्यात आले होते, असे स्थानिकांनी सांगितले. या गोदामात डझनभर गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. याच सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस गोदामाच्या मालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत.