आगळंवेगळं – हाँगकाँगमधील मराठी संस्कृती

>> मेघना साने

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली मराठी संस्कृती टिकवून असतो. परदेशातील मराठी माणसेदेखील एकमेकांच्या साहाय्याने ही संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र मंडळे स्थापून आपले सण-उत्सव साजरे करतात. याच ओढीने हाँगकाँगमध्ये मुलांसाठी पाककृती स्पर्धेसारखा एक अभिनव उपक्रम राबवला गेला. ज्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. हाँगकाँगसारख्या ठिकाणी मराठी संस्कृती टिकवण्याचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल.

‘तुम्ही जर पट्टीचे खाणारे असाल तर हाँगकाँगमध्ये तुमची चंगळ आहे. जगभरातील सर्व देशांतील सर्व प्रकारचे पदार्थ इथे चाखायला मिळतात. आता हाँगकाँगमध्ये बरीच भारतीय उपाहारगृहे आहेत. पण अजून तिथे मराठी पदार्थ मिळत नाहीत, असे हाँगकाँगचे डॉ. मनोज कुलकर्णी सांगत होते. नवी मुंबई, वाशी येथे भरलेल्या ‘विश्व मराठी संमेलन 2024’ मध्ये निरनिराळ्य़ा देशांतील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी आले होते. त्या संमेलनातल्या पाहुण्यांमधून मी हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाच्या माजी अध्यक्षांना शोधले. ते होते डॉ. मनोज कुलकर्णी. ते सध्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे हाँगकाँगमधील उपसमन्वयक म्हणून काम करतात. संमेलन संपताना  डॉ. मनोजबरोबर गप्पा रंगल्या.

‘तेथे लोक काय खातात? ताजी मासळी, पापलेट, बोंबील वगैरे मिळतात का?’ यावर डॉ. मनोज म्हणाले, ‘चांगली फडफडीत मासळी मिळते. कदाचित बटाटेवडेही मिळतील हॉटेलमध्ये. यापेक्षा जास्त मराठी पदार्थाची अपेक्षा करू नका.’

डॉ. मनोज कुलकर्णी पूर्वी शांघायमधे राहात असताना ‘शांघाय मराठी’ या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष होते. ते सप्लाय चेन मॅनेजमेंट तज्ञ म्हणून प्रसिद्ध असून हाँगकाँग येथील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. हाँगकाँगमध्ये आल्यावर तिथल्या मराठी माणसांशी ते संपर्क करू लागले. 2010 नंतर हाँगकाँगमध्ये नोकरीनिमित्त भारतातून येणाऱ्या तरुणांच्या संख्या वाढली. 1990 पासून तेथे मराठी मंडळेही स्थापन होऊ लागली. 2012 मध्ये डॉ. मनोज कुलकर्णी महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँगचे अध्यक्ष झाले. नवनवीन अभिनव उपक्रम राबवू लागले. खूप वर्षे हाँगकाँगमधे राहात असलेल्या आणि तेथे नव्याने राहायला आलेल्या लोकांना एकत्र करून त्यांनी महाराष्ट्र मंडळाचा विस्तार केला.

महाराष्ट्र मंडळात लोक एकमेकांना भेटले की मराठीत बोलतात. प्रश्न येतो तो लहान मुलांचा. त्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाने मंडळाच्या सध्याच्या अध्यक्षा मुग्धा रत्नपारखी यांच्या मदतीने ‘बोलतो मराठी’ या शीर्षकाखाली मराठीचे वर्ग घेण्यास सुरूवात केली. यात मुलांना  बोलता येणे, मुळाक्षरे लिहिता येणे इथपासून सुरूवात केली. करोनाच्या काळात हे वर्ग ऑनलाईन होते. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या योजण्यात आल्या. डॉ. मनोज कुलकर्णी महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँगचे अध्यक्ष असताना त्यांनी ‘बोलतो मराठी’च्या मुग्धा रत्नपारखी आणि मंडळाचे तरुण सदस्य तेजस मोरे यांच्या मदतीने मुलांसाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेचे नियम असे होते. साधारण 12 वर्षांखालील मुलांनी एक मराठी पदार्थ बनवायचा. उदाहरणार्थ, साबुदाणा खिचडी बनवली तर पाककृती सांगताना साबुदाणा, शेंगदाणा, जिरे वगैरे पदार्थांचे उच्चार मुलांना करता आले पाहिजेत. भाज्यांचे सूप बनवले तर त्यातील भाज्यांची नांवे सांगता आली पाहिजेत. पाककृती देखील मराठी भाषेत नीट सांगता यायला हवी. पालकांनी घरातील स्वयंपाकघर वापरायला द्यावे पण मुलांवर लक्ष ठेवावे आणि पालकांचा सहभाग फक्त व्हिडिओ बनवण्यापुरताच असावा. व्हिडीओ तयार झाला की तो वेबसाइटवर अपलोड करावा. डॉ. मनोज कुलकर्णी सांगत होते की या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. अरुणा साठे-सोमण, अश्विनी प्रधान आणि सुनील कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

डॉ. मनोज यांनी मला या स्पर्धेचे सगळे व्हिडिओज उपलब्ध करून दिले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावीत असे दृश्य दिसले. हाँगकाँगमधील 5 आणि 7 वर्षांची मराठी मुले पदार्थ तयार करत होती. त्यात चटपटीत चणे, कांदेपोहे, कोशिंबीर, सोलकढी असे विविध पदार्थ स्पर्धकांनी निवडले होते. साहित्यही नीट मांडून ठेवले होते आणि मुले मराठी भाषेत कृती सांगत होती. एका व्हिडिओत एक गमतीदार गोष्ट दिसली. एक मुलगा पदार्थ बनवत असताना त्याची धाकटी बहीण त्याच्या आजूबाजूला खेळत होती. पण तिकडे लक्ष न देता तो एकाग्रतेने पदार्थ बनवत होता.

थोडय़ा मोठय़ा म्हणजे 10 ते 12 वर्षांच्या मुलांनी पालक वडी, मटकीची उसळ, वरणफळ, मटारच्या करंज्या असे कठीण पदार्थ तयार केले होते. त्याच्या वयाच्या मानाने हे खूपच कौतुकास्पद होते. त्यांना ट्रेनिंग देणाऱ्या पालकांचेही मला कौतुक वाटले. दोन गटांमध्ये अपूर्व जोशी आणि पार्थ टिपणीस ही मुले विजयी झाली होती तर तिसऱ्या गटात अनुष्का ओक हिने शेंगोणी आणि बटाटा भुजणे हा कोणाला माहीत नसलेला पदार्थ बनवून बक्षीस मिळवले होते.

स्पर्धा तशी कठीणच होती. नुसता पदार्थ बनविल्यावर काम संपणार नव्हते. तर पदार्थ बनवून झाल्यावर आवराआवरी करून भांडीही घासायची होती आणि पदार्थाची किंमतही सांगायची होती. त्याप्रमाणे मुलांनी सर्व मराठीतून कथन केले.

डॉ. मनोज यांच्याकडून हाँगकाँगविषयी खूप माहिती मिळाली. भाजीमंडईमध्ये विविध प्रकारच्या ताज्या भाज्या, रंगीबेरंगी फळे, ताजे मासे यांची सुंदर आरास मांडलेली असते. पिंजऱ्यातील पाळीव प्राणी, पक्ष्यांपासून कुंडय़ांतील आकर्षक पुष्परचनांपर्यंत अनेक गोष्टींनी एक-एक गल्ली सजलेली असते. जगभरातील अतिप्रचंड महाग ब्रॅण्ड्स झगमगत्या दुकानांतून मिरवत असतात. तेथील बाजार संस्कृती मुक्त जीवनात मद्यापासून मसाजपर्यंत मस्तीत मौज करत पैसा कसा उधळावा हे दाखवते.

हे सर्व असले तरी तिथल्या मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीशिवाय चैन पडत नाही. मराठी माणसे एकमेकांना शोधत येतात. महाराष्ट्र मंडळात सण-उत्सव साजरे करतात. पाककृती स्पर्धेसारखे काही अभिनव उपक्रमही राबवतात. अशानेच परदेशात मराठी संस्कृती आणि भाषा टिकून राहण्यास मदत होते.

[email protected]