राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोलापूर येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलात घुसून घोषणाबाजी केली.

सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाची गरजच काय, असा सवाल केला होता. यामुळे मराठा आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. राज ठाकरे हे आज सायंकाळी धाराशीव येथे पोहोचले. ते थांबलेल्या पुष्पक पार्क हॉटेलात मराठा आंदोलक पोहोचले. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली, परंतु भेट नाकारण्यात आल्याने संतापलेले मराठा आंदोलक हॉटेलात घुसले. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला.