
>> अभिराम भडकमकर
असंख्यांचे परम मित्र, अत्यंत ऋजु स्वभावाचे, व्यासंगी माधवराव. आर्थिक गणिते न बांधता महत्त्वाचे पुस्तक समाजाला वाचायला उपलब्ध व्हावे म्हणून प्रसिद्ध करणारे प्रकाशक माधवराव जोशी हरपले. या लेखाचा पूर्वार्ध छापून आला तेव्हा त्यांची आठवण आली आणि आज या लेखाच्या उत्तरार्धात त्यांना श्रद्धांजली वाहावी लागेल असं कल्पनेतही नव्हतं.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहित्य व नाटक दोहोंवर प्रेम करणारे रसिक आणि दर्दी! माधवराव खाडीलकर यांच्या ‘अनादि मी अनंत मी’ या सावरकरांवरील नाटकाचं पुस्तक झाल्यानंतर या पुस्तकाला साक्षात बाळासाहेबांची प्रस्तावना लाभली. त्यांची अतिशय सुरेख प्रस्तावना पुस्तकात वाचायला मिळते. बाळासाहेबांनी या नाटकाच्या संहितेचा बारकाईने विचार करत त्यातील नाट्य, साहित्य आणि विचार यावर भाष्य केलं आहे. यातील नाट्यगुणांचे वर्णन ते करतात. साहित्यिक मूल्य जोखतात. शैली व मांडणीवरही बोलतात आणि आशयावरही.
एका ठिकाणी साहेब म्हणतात, ‘आज काळालाच जणू कर्करोगाने पछाडलं आहे. त्यामुळे सावरकरांनी जे सांगितलं ते आपण विसरतो आहोत.’ बाळासाहेबांचा आशीर्वाद लाभलेल्या या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाट्य लेखनाचं त्या वर्षीचं बक्षीस मिळतं आणि अभिनेते माधवराव आता अधिकृतरीत्या नाटककारही होतात.
या सगळ्या प्रवासामध्ये आशा खाडिलकर या त्यांच्या पत्नीचे योगदान मोठे आहे. त्यामध्येही एकदम गंमत आहे. आशाताईंच्या वाड्यासमोरून जाताना एकदा त्यांनी आपल्या भावाला म्हटलं की, या वाड्यातल्याच एका मुलीशी माझं लग्न होणार आहे आणि जणू काही नियतीच त्यांच्या तोंडून त्या क्षणी बोलली होती. विवाह झाला आणि आयुष्यभर या दोन कलासक्त माणसांचा सुरेल संसारही झाला.
एक कलावंत म्हणून आणि एक माणूस म्हणून जगाकडे पाहण्याची दृष्टी या आत्मकथनामध्ये आहे. पूर्णपणे व्यवसाय म्हणून नाटक स्वीकारणं अत्यंत अवघड असलेल्या काळामध्ये अनेकांनी अर्थाजन वेगळं आणि कला वेगळी ठेवून दोन्हीचा अत्यंत चांगल्या प्रकारे समन्वय साधला. माधवराव त्यापैकीच एक. बँक मॅनेजर म्हणून अधिकाधिक वरच्या पदांवर जात असताना त्यांनी अनेकांना मदत केली. तसंच कलावंत म्हणून ‘अनादी मी अनंत मी’ सादर करत असताना अनेकांना कलात्मक आनंद दिला.
अशा सांगलीतल्या जायगव्हाण या अत्यंत छोट्याशा खेड्यातून दिल्ली, जर्मनीपर्यंत मजल मारलेल्या या कलावंताचं आयुष्य ‘खरं सांगायचं तर’ या आत्मकथनात शब्दबद्ध झालं आहे. परममित्र प्रकाशनने अतिशय देखण्या स्वरूपामध्ये हे आपल्यासमोर सादर केलं आहे. हे केवळ एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाही तर काळाचा एक प्रचंड मोठा तुकडा आपल्यासमोर येतो. ज्यामध्ये तत्कालीन सामाजिक आणि कलात्मक खाचखळग्यांचा एक लेखाजोखा आपल्याला दिसतो. अशी अधिकाधिक आत्मकथनं मराठी कलावंतांच्या लेखणीतून उतरली पाहिजेत. त्यांची शब्दकळा, त्यांची शैली ही साहित्यिक कसोट्यांवर घासून घेण्याची आवश्यकता नाही. कारण अशी आत्मकथनं हा आपला सांस्कृतिक आणि कलात्मक इतिहास असतो.
‘खरं सांगायचं तर’ हे शीर्षक असलेल्या या आत्मकथनामध्ये सगळं काही खरं खरं सांगितलं आहे. कारण या माणसाचं आयुष्यच इतकं स्वच्छ आणि पारदर्शक की त्यात काही लपवण्यासारखं नाहीच.
हे लिहिताना एक ‘अनपेक्षित उत्तरार्ध!’ वाट्याला आला. या लेखाचा पूर्वार्ध प्रकाशित झाला आणि परममित्रच्या माधवराव जोशींना व्हॉटस्अॅप केला. दोन तीन दिवस ब्लू टिक दिसली नाही म्हणून आश्चर्य वाटलं. पण उत्तरार्ध आला की बोलू असा विचार केला. पण नियतीने वेगळंच योजलं होतं.
बातमीच आली, ‘परममित्र प्रकाशनाचे माधवराव जोशी गेले!!!’
मी स्तब्धच झालो. असंख्यांचे परम मित्र, अत्यंत ऋजु स्वभावाचे, व्यासंगी माधवराव. आर्थिक गणिते न बांधता महत्त्वाचे पुस्तक समाजाला वाचायला उपलब्ध व्हावे म्हणून प्रसिद्ध करणारे प्रकाशक हरपले.
आज या लेखाच्या उत्तरार्धात त्यांनाही श्रद्धांजली वाहावी लागेल असं कल्पनेतही नव्हतं.
नियतीचा विक्षिप्त खेळ!
दुसरं काय!
माधवरावांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांबतो.
(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)