ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन; पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे मंगळवारी पुण्यात राहत्या घरी निधन झालं आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. त्यांनी साकारलेली खलनायिकेची भूमिका रसिकांनी भावत होती. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायिका अशी त्यांची ओळख होती. 2011 मध्ये रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटात दिसल्या होत्या. हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपटही ठरला. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी अभिनयाची सुरुवात केली होती. त्यांनी सुमारे 100 हुन अधिक चित्रपटात काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकरली. त्यामुळे त्यांना लोकप्रिय खलनायिका म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या मृत्यूने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सुहासिनी या मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या कतृत्वाने नावजल्या गेल्या होत्या. मानाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), मी शपथ (2006) आणि चिरंजीव (2016) अशा हिट चित्रपटात त्यांनी भूमिका साकरली होती.या चित्रपटांचा समावेश आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोनीश पवार दिग्दर्शित ‘धोंडी’ या चित्रपटातही त्या दिसल्या होत्या. त्या एन. रेळेकर दिग्दर्शित 2017 चा मराठी चित्रपट ‘छंदा प्रीतीचा’ आणि 2019 चा ‘बाकाल’ या चित्रपटातही त्या दिसल्या होत्या. कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं यासारख्या नाटकातही त्यांनी भूमिका बजावल्या. त्यांच्या योगदानाबाबत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.