‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप

‘दशावतार’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आधीच चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘दशावतार’ ला भरभरून प्रेम मिळात आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत 2.2 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

सुबोध खानोलकर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘दशावतार’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘दशावतार’चे हाऊसफुल झाला आहेत. ‘सॅकनिल्क’च्या आकड्यांनुसार ‘दशावतार’ ने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड तब्बल 65 लाखांची कमाई केली. तर हिंदुस्थानात चित्रपटाने 58 लाखांचे कलेक्शन केले. ‘दशावतार’ने शनिवारी तब्बल 1.39 कोटींची कमाई केली आहे. रविवारी आणखी जास्त कमाई होईल, असा अंदाज आहे. चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीही चांगली मिळत आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या भूमिका आहेत.