
अलीकडच्या काळात बॉलीवूडमध्ये भयपटांचा (हॉरर) ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झालेला आहे. अशातच आता बऱ्याच वर्षांनी मराठीत हॉरर जॉनर येतोय. अभिनेते किशोर कदम यांचे दोन भयपट लवकरच येताहेत. ‘जारण’ हा मराठी चित्रपट आणि ‘अंधार माया’ ही वेबसीरिज थरकाप उडवायला येतेय. फक्त कॉमेडी म्हणजे मनोरंजन अशी मनोरंजनाची तोकडी व्याख्या करण्यात आली आहे. या व्याख्येला छेद देणाऱ्या या कलापृती असल्याचे किशोर कदम यांनी सांगितले. भयपटाचा थरार नक्की अनुभवा, असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केलेय.
‘फँड्री’, ‘नटरंग’, ‘बालक-पालक’ अशा अनेक सामाजिक आशयघन चित्रपटांनंतर किशोर कदम वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्यासमोर येताहेत. त्यांची ‘अंधार माया’ ही वेबसीरिज ‘झी फाइव्ह’वर येत्या 30 मेपासून पाहता येईल. तर ‘जारण’ हा चित्रपट येत्या 5 जून रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. याविषयी किशोर कदम म्हणाले, दोन्ही हॉररपट एकामागून एक येताहेत… पण दोन्ही भूमिका भिन्न. ‘अंधार माया’मध्ये ज्याला सगळे घाबरतात असा मी आहे, तर ‘जारण’मध्ये काळी जादू केलेल्यावर उपचार करणाऱ्या सायपॅट्रीस डॉक्टरचे काम मी केले आहे. दोन्हीचा गेटअप वेगळा. दोघांची पार्श्वभूमी वेगळी. त्यांचं जगणं, निसर्ग वेगळा आणि दिग्दर्शकांचे टॅलेंटही वेगळे. याआधी मी मानसोपचारतज्ञ साकारलेला नाही. त्यामुळे काहीतर वेगळं करायला मिळणं हा विचार होताच. पण त्याशिवाय लेखक-दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते आणि निर्माता अमोल भगत या दोन मित्रांसाठी ‘जारण’ सिनेमा केलाय, असे किशोर कदम म्हणाले.
z भीती ही भावना सगळ्या माणसांमध्ये सारखीच असते. प्रत्येक माणसामध्ये भीती दडलेली असते. त्या भीतीवर आधारित ‘अंधार माया’ ही वेबसिरीज आहे. झी फाइव्हवरील ही पहिली मराठी हॉरर वेबसीरीज आहे. सर्व भाषेतील लोकांना ही कॅमेऱ्यातून सांगितलेली गोष्ट आवडेल, असे किशोर कदम म्हणाले.
z ‘जारण’ हा चित्रपटदेखील भय याच संकल्पनेवर आहे. जारणमारण म्हणजे काळी जादू नक्की अस्तित्वात आहे का? ते सायकॉलॉजिकल असेत की खरे? मग किती खरं? यामध्ये माणूस खरोखरच घाबरतो की त्याने स्वतःची भीती निर्माण केलेली असते? असा उलगडा ‘जारण’मध्ये होणार आहे. याबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारा हा चित्रपट आहे, असे ते म्हणाले.