दरवर्षी 3 ऑक्टोबरला ‘अभिजात मराठी भाषा दिवस’; आठवडाभर व्याख्याने, प्रदर्शने, विविध स्पर्धांचे नियोजन

मराठीच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्यासाठी आता दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला होता. त्यानुषंगाने आता अभिजात मराठी भाषा दिवस आणि सप्ताह साजरा करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि संशोधनाला गती देण्यासाठी अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. प्राचीन मराठी ग्रंथांची प्रदर्शने, ताम्रलेख आणि शिलालेखांची प्रदर्शने भरवून विद्यार्थी व सामान्य जनतेला मराठी भाषेतील अभिजात ग्रंथपरंपरेची ओळख करून दिली जाईल.

प्राचीन ग्रंथसंपदेचे समकालीन मराठीमध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये अभिजात मराठी ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन करून त्याची विद्यार्थ्यांना तोंडओळख करून देणे आणि जतन-संवर्धनाच्या पद्धतीचे चलचित्र सादरीकरण (स्लाइड शो) करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजुषा, निबंध लेखन आणि वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, खासगी उद्योग, आस्थापना, व्यापारी बँका आणि सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.