
‘मास्टर माइंड’ आणि ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या गाजलेल्या नाटकांनंतर अस्मय थिएटर्सने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. प्रख्यात नाटककार रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय पेंकरे दिग्दर्शित ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाने अवघ्या काही काळातच 50 प्रयोगांचा टप्पा पार करत सुवर्ण महोत्सवाकडे आगेकूच केली आहे.
स्वभाव, विचारधारा आणि दृष्टिकोनाच्या बाबतीत एकमेकांच्या अगदी विरुद्ध असलेले दोन पुरुष या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. अनपेक्षितपणे त्यांची भेट होते आणि या भेटीतून पुढे गैरसमज, गोंधळ आणि हास्याची भन्नाट मालिका सुरू होते. हसवता हसवता ही कथा रसिक प्रेक्षकांना विचार करायलाही लावते.
वैभव मांगले आणि आनंद इंगळे यांची रंगतदार जोडी या नाटकात प्रेक्षकांना खळखळून हसवते. निर्माता अजय विचारे आणि दिग्दर्शक विजय पेंकरे यांची ही सलग तिसरी यशस्वी निर्मिती ठरली असून, आधीच्या नाटकांप्रमाणे यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग मंगळवार, 31 मार्च रोजी दुपारी 4 वाजता, दादरच्या शिवाजी मंदिरात रंगणार असून, नाटय़सृष्टीतील आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
नव्या नाटकाची जुळवाजुळव सुरू
तीन महोत्सवी नाटकांनंतर अस्मय थिएटर्सने त्यांच्या नव्या नाटकाची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र नेमपं कोणतं नाटक आणि कोणते कलाकार असतील याबद्दल आताच उत्सुकता निर्माण झाली आहे.
























































