
>>पराग खोत
काही नाटकं निखळ मनोरंजन करतात, तर काही विचार करायला लावतात. काही खळखळून हसवतात तर काही हलकेच डोळ्यांच्या कडा ओलावतात. काहींत तरुणाईची झिंग असते तर काहींमध्ये अनुभवांची परिपक्वता. या गुढीपाडव्याला आलेलं ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नवंकोरं नाटक प्रेक्षकांना हे सगळे भावानुभव देतं. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याला आपल्या भूतकाळाची एक सोनेरी किनार जोडलेली असते. अगदी शाळकरी वयापासून ते लग्न आणि मुलं होईपर्यंतच्या आठवणींचा सुबकतेने विणलेला गोफ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येतं. हा आपल्या नात्यांचा एक अस्सल नाटय़ानुभव आहे.
शशांक सदावर्ते आणि मानसी बोरकर-सदावर्ते या जोडप्याने लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर घटस्पह्टासाठी अर्ज केलेला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ते एका समुपदेशन करणाऱ्या दाम्पत्याला भेटतात आणि त्यांचा त्या भेटीतून त्यांच्या नात्यातील अनेक थर, आठवणी, तक्रारी, प्रेम आणि न बोललेले भाव हळूहळू उलगडत जातात. अगदी शाळेपासून म्हणजे जवळपास 38 वर्षे एकत्र असलेलं हे जोडपं आता वेगळं का होतंय? त्यातही घटस्पह्टासाठी ‘ती’ आग्रही आहे तर घटस्पह्ट होऊ नये म्हणून ‘तो’ तळमळतोय. अर्थात इतक्या वर्षांत तिची झालेली घुसमट, त्याचं झालेलं दुर्लक्ष आणि एक माणूस म्हणून दोघांनाही हवी असलेली स्पेस या गोष्टी हळूहळू पुढे येतात. अनेक प्रश्न पडतात आणि त्यांची न शोधली गेलेली उत्तरे आपल्याला दिसतात. पुढे काय होतं? त्या दोघांच्या आणि पर्यायाने आपल्याच नात्यांची आंबटगोड गोष्ट सांगणारं हे नाटक त्यातील अस्सलतेमुळे मनाला अधिक भिडतं.
गत आयुष्यातील छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांतून घडत गेलेल्या या नात्याचा वेध घेताना हे नाटक विनोदी, भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या क्षणांनी समृद्ध होत जातं. आजच्या काळात अनेक नात्यांमध्ये हरवत चाललेले संवाद, समज-गैरसमज आणि परस्परांबद्दल असलेला आदर यांचा डोळस शोध हे नाटक घेतं. विशेष म्हणजे इथे पन्नाशी ओलांडलेल्या जोडप्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणि त्यातील उबदारपणा असला तरी ही गोष्ट सर्व पिढय़ांतील प्रेक्षकांना आपलीशी वाटते. 1990 सालच्या ‘धडाकेबाज’ या महेश-लक्ष्याच्या सिनेमातलं एक गाजलेलं गाणं या नाटकाचं शीर्षक आहे. त्या सिनेमाचा संदर्भ नाटकात आहेच आणि या गाण्याचा अप्रतिम वापर करत लेखक दिग्दर्शकाने हे नाटय़ फुलवत नेले आहे. शशांक आणि मानसीसोबतच त्यांचं समुपदेशन करणाऱ्या आदित्य आणि सायली या जोडप्याचेसुद्धा एक उपकथानक आहे. विशेषतः आदित्यचा दुखरा कोपरा या विषयाला एक भावनिक जोड देतो.
हे नाटक फक्त चार पात्रांचं असलं तरीही त्यातील दोन पात्रांनी निभावलेल्या अनेक वेगवेगळ्या भूमिकांमुळे या नाटकात एक वेगळीच गंमत येते, ती रंगमंचावर पाहण्यासारखी. वेगवेगळ्या काळातील अनेक प्रसंग आणि घटना एकामागून एक आपल्यासमोर येतात आणि आपण त्यात गुंतून जातो. लेखक दिग्दर्शकाने नाटकाचा वेग उत्तम राखलाय. भावनिक प्रसंग असूनही ते कुठे रेंगाळत नाहीत हे विशेष. सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित तसंच शुभंकर एकबोटे आणि अमृता बने ही खऱ्या आयुष्यातली जोडपी नाटकातही नवराबायकोच असल्याने त्यांच्यातील नात्यांचं बाँडिंग आणि केमिस्ट्री ठळकपणे अधोरेखित होते.
आदित्य आणि सायली या समुपदेशकाच्या भूमिकेतील शुभंकर आणि अमृता यांनी इतर अनेक भूमिका साकारून धमाल केलीय. त्यांचा हा भूमिकाबदल इतका जलद आणि काही वेळा मुक्तनाटय़ाचा फॉर्म वापरून आकाराला येतो आणि त्यातील रंजकता अधिक वाढते. सुमित राघवन वेगवेगळ्या माध्यमातला त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव घेऊनच रंगमंचावर अवतरतात. त्यांचा तत्वनिष्ठ तरीही समंजस आणि काहीसा हतबल शशांक भावतो. त्यांचा विनोदाचा सेन्स आणि टायमिंग अफलातून आहे याचा पदोपदी प्रत्यय येतो. त्यांना तितकीच समर्थ साथ दिलीय ती चिन्मयी सुमित यांनी. काही प्रसंगांत तर त्या कांकणभर सरसच ठरतात. विशेषतः त्यांच्या शेवटच्या स्वगतातून त्या एका गृहिणीची तडफड आणि घुसमट ज्या ताकदीने दाखवतात त्याला तोड नाही. अस्तित्वमधल्या गंभीर भूमिकेनंतर या नाटकात त्यांनी घेतलेलं मिश्किल बेअरिंग निव्वळ अप्रतिम.
हे नाटक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अॅक्शन रिप्ले आहे. तुम्ही शाळेत असल्यापासून ते आतापर्यंत तुमच्या आयुष्याचा तुमच्यासमोर धरलेला हा आरसा वाटावा इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार यात केलेला दिसतो आणि त्या अगदी हुबेहूब मांडलेल्या आहेत. यासाठी या नाटकाचा लेखक ओंकार गोखले याचं विशेष काwतुक. ‘आता थांबायचं नाय’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा तो लेखक आहे. मुळात लेखनातच दमदार असलेलं हे नाटक दिग्दर्शित सूरज पारसनीस या गुणी दिग्दर्शकाने परिश्रमपूर्वक बसवलंय. लेखनात निर्माण केलेली प्रत्येक जागा खुबीने घेऊन दिग्दर्शक आणि कलाकारांनी बहार उडवून दिलीय. नीरज शिरवईकरचं नेपथ्य परिणामकारक आहे. नीरज स्वतः लेखक दिग्दर्शक असल्याने प्रसंगबदलाला पूरक असं आटोपशीर नेपथ्य त्याने चोख उभं केलंय जे नाटकाच्या परिणामकारकतेत भर घालतं. संगीतकार म्हणून सुमित आणि चिन्मयी यांचा मुलगा नीरज सुमित याने पदार्पण केलंय.
आपल्या नात्याला नेमपं काय हवंय हे जाणिवेने अनुभवायचं असेल तर आयुष्याच्या या गणिताचं मर्म समजून घ्यायला हवं. त्याकडे अधिक सकारात्मक आणि खेळकर नजरेने पाहणं हा एक उत्तम पर्याय आहे. हे नाटक तुम्हाला तोच पर्याय उपलब्ध करून देतं. तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या नोंदी या नाटकातील घटना आणि प्रसंग यांच्याशी जुळतील एवढं नक्की.
nलेखक ः ओंकार गोखले
nदिग्दर्शक ः सूरज पारसनीस
nकलाकार ः सुमित राघवन, चिन्मयी सुमित, शुभंकर एकबोटे, अमृता बने
nनेपथ्य ः नीरज शिरवईकर
nसंगीत ः नीरज सुमित
nगीत ः शिवप्रिया सुर्वे
nनिर्माता ः दिलीप जाधव, सुमित राघवन, चिन्मयी सुमित
nसूत्रधार ः प्रणित बोडके
























































