‘मराठी बाणा’कुणाचा? हायकोर्टात आज फैसला,अशोक हांडेंचा शेमारूविरोधात दोनशे कोटींचा दावा

842

‘मराठी बाणा’ हा सर्व प्रचलित शब्द आहे. या शब्दातून मराठीविषयी असलेली भावना दिसून येते. अनेकदा हा शब्द स्वाभिमानासाठीच वापरला जातो. एवढेच काय तर 19 व्या शतकापासून ‘मराठी बाणा’ हा शब्दप्रयोग वापरला जात असून ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्यांमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आजकाल फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरही हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. म्हणूनच ‘मराठी बाणा’ या शब्दावर कोणीही हक्क गाजवू शकत नाही असा युक्तिवाद शेमारू कंपनीच्या वतीने  मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. याप्रकरणी आज अंतिम निर्णय देण्यात येणार आहे.

संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी रसिकांमध्ये प्रचलित असलेले दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम  सर्वश्रुत आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम घेत असून ‘मराठी बाणा’  या नावासाठी अशोक हांडे यांनी ट्रेडमार्क घेतले आहे. असे असतानाही शेमारू एंटरटेन्मेंट लिमिटेड या कंपनीने नव्या मराठी चॅनेलसाठी ‘मराठी बाणा’ हे नाव दिले आहे.  ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन झाल्याचा दावा करत दिग्दर्शक अशोक हांडे यांनी माहीम पोलीस ठाण्यात 26 जानेवारी रोजी तक्रार नोंदवली. पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याचे लक्षात येताच हांडे यांनी चौरंग संस्थेमार्फत ऍड. राजेंद्र पै यांच्या वतीने हायकोर्टात सूट याचिका दाखल केली. कंपनीने मराठी बाणा हे नाव तत्काळ हटवावे तसेच नुकसानभरपाईपोटी 200 कोटी रुपये देण्याचे हायकोर्टाने कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत यावरील अंतिम निकाल राखून ठेवला .

आपली प्रतिक्रिया द्या