
‘मराठी नाटकांना प्रेक्षक मिळत नाहीत’, हा समज आता ‘संगीत देवबाभळी’ आणि ‘शिकायला गेलो एक’ या नाटकांनी खोडून काढला आहे. या नाटकांच्या तिकिटासाठी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सकाळी सहा वाजल्यापासून प्रेक्षकांच्या रांगा लागत आहेत. विकेण्ड सोडून इतर दिवशीही ‘हाऊसफुल्ल’च्या पाटय़ा झळकत आहेत. ‘संगीत देवबाभळी’ पाहण्यासाठी तर अमराठी प्रेक्षकही गर्दी करत आहेत.
उन्हाळय़ाच्या सुट्टीमुळे प्रदर्शित झालेले बिग बजेट चित्रपट, ओटीटीवरील नवनवीन सीरिज, मालिकांचे महाएपिसोड त्यातच ‘आयपीएल’ची रणधुमाळी अशी तगडी आव्हाने समोर असतानाही ‘संगीत देवबाभळी’, ‘शिकायला गेलो एक’ या नाटकांसह ‘असेन मी…नसेन मी’, ‘वरवरचे वधू-वर’, ‘कुटुंब किर्रतन’, ‘जर तरची गोष्ट’, ‘आमने सामने’ अशी वेगवेगळय़ा विषयांवरची नाटपं प्रेक्षकांना रंगभूमीकडे वळवण्यात यशस्वी ठरत आहेत.
मराठी रंगभूमीसाठी आशादायी चित्र
‘संगीत देवबाभळी’ आणि ‘शिकायला गेलो एक’ ही नाटकं पाहण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून प्रेक्षकांच्या रांगा लागतायत. मराठी रंगभूमीसाठी हे नक्कीच आशादायी चित्र आहे, असे दीनानाथ नाटय़गृहाचे तिकीट विक्री व्यवस्थापक चंद्रकांत मुरमुरे आणि महेश पावसकर यांनी सांगितले.
परेश रावल यांनी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत ‘संगीत देवभाबळी’चे काैतुक केले होते. त्यानंतर केवळ मराठीच नाही तर जबलपूर, बंगळूरू आणि गोव्यातील अमराठी प्रेक्षकही हे नाटक पाहण्यासाठी गर्दी करतायत. 1 मे ते 15 जून या कालावधीतील राज्यातील आमचे 50 पैकी 45 प्रयोग आधीच हाऊसफुल्ल झाले. गिरगावच्या साहित्य संघाची बाल्कनी गेली 12 वर्षे उघडली गेली नव्हती ती यानिमित्ताने उघडली. पुणे, कोथरूड, हडपसर, नाशिकमधील नाटय़गृहांत हीच परिस्थिती. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शिवाजी महाराज मंदिर नाटय़गृहात प्रेक्षकांच्या आग्रहास्तव डिमांड शो ठेवावे लागले.




























































