चिमुकलीवरील अत्याचाराच्या विरोधात मराठवाडा रस्त्यावर; भर पावसात जनतेचे उत्स्फूर्त आंदोलन

बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचारासह राज्यात महिलांवर दररोज होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात मराठवाडा रस्त्यावर उतरला. पाऊस पडत असतानाही उत्स्फूर्तपणे जनतेने सरकारच्या निर्लज्जपणाचा तीव्र निषेध केला. ‘फाशी द्या फाशी द्या… नराधमाला फाशी द्या’, ‘शक्ती कायदा झालाच पाहिजे’, ‘नको आम्हाला पंधराशे…’, ‘चिमुरडीला न्याय द्या, नाही तर खुर्च्या खाली करा’, अशा गगनभेदी घोषणांनी मराठवाडा दुमदुमुन गेला.

छत्रपती संभाजीनगरात क्रांतीचौकामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे, तोंडाला काळी पट्टी बांधून महिलांवरील अत्याचाराचा तीव्र निषेध केला. पैठण, सिल्लोड, वैजापूर, फुलंब्री, सोयगाव, कन्नड, गंगापूर आदी ठिकाणीही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. जालना जिल्ह्यात परतूर, अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, मंठा तालुक्यात मिंधे सरकारच्या निर्लज्ज कारभाराचा निषेध करण्यात आला.

परभणी, नांदेड, हिंगोली, बीडसह लातूर, धाराशिव जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे आणि तोंडाला काळी पट्टी बांधून चिमुकलीवरील अत्याचाराचा निषेध केला. यावेळी मिंधे सरकारच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.