मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका फोनने केली कमाल, वाचा सविस्तर बातमी

41235
cm-uddhav-thackeray-1

थायलंडवरून 14 मार्चला निघालेल्या मरिला डिस्कवरी ही क्रूझ 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील बंदराला लागणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाचा कहर झाला आणि या क्रूझला बंदरात उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. 146 हिंदुस्तानी खलाशी आणि नाविक तब्बल 37 दिवस यावर अडकले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मंडविया यांच्याशी संवाद साधला. या यशस्वी मध्यस्थी नंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी उशिरा यासंदर्भात आदेश जारी केला. उद्या सकाळी हे सर्व कर्मचारी मुंबई बंदरात उतरतीलच पण मुख्यमंत्र्यांच्या या एका फोनमुळे ठिकाणी जहाजांवर अडकलेल्या 40,000 खलाशी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दोन ते सहा एप्रिल या कालावधीमध्ये मरिला डिस्कवरी ही क्रूझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहोचणार होती. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आणि या क्रूझने लाएम चाबँग,थायलंडमध्ये 14 मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रूझ 12 एप्रिल रोजी कोचीन येथे पोहोचली. पण या क्रूझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रूझ मुंबईजवळच्या समुद्रात 14 एप्रिल रोजी पोहोचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. थायलंड सोडून 37 दिवस होऊन गेले होते मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सांगितले तरी परवानगी मिळत नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात नौकानयन मंत्र्यांना फोन करून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. प्रधान सचिव विकास खारगे आशिष कुमार सिंह आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया हे सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते.

केंद्राचा आदेश अडकलेल्या 40,000 खलाशांना ही लागू होणार
मुख्यमंत्र्यांच्या एका फोनवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने जहाजे,क्रूझ बंदरावर नांगरण्यासाठी एक आदेश काढला. त्यानुसार या खलाशी नाविक, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गेल्या 28 दिवसातील प्रवासाची माहिती कळवणे तसेच बंदरावर उतरल्यावर कोव्हीड चाचणी करून घेणे, प्रसंगी क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. या खलाशी व कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रान्झिट पास, वाहनाची व्यवस्था आदी बाबींचाही या आदेशामध्ये समावेश आहे. याचा फायदा समुद्रात सध्या विविध जहाजांवर अडकलेल्या 35 ते 40 हजार हिंदुस्तानी खलाशांना होणार आहे

मरिला डिस्कवरी च्या खलाशांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई बंदरात दाखल होणाऱ्या क्रूझच्या खलाशांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीबाबत केंद्र सरकारचे बोलून 15 तासात आमचा प्रश्न सोडवला, त्यामुळे आम्हाला पुन्हा आमच्या देशाच्या भूमीवर उतरता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आम्ही आभार मानत आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणत या खलाशांनी उद्या सकाळी साडेअकरा वाजता मुंबई बंदरात उतरणार असल्याचे सांगितले. उद्या सकाळपासून या मरिला डिस्कवरी क्रूझवरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरवणे सुरू होईल. त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे, प्रसंगी त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध ठेवण्यात आली आहे. ही क्रूझ पुढे नॉर्वे साठी रवाना होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या