सध्या देशात सणउत्सवाचे वातावरण असून रविवारी करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना राजस्थानमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक महिला करवा चौथची पूजा आटोपून आपल्या पती- मुलांसह बाहेर फिरण्यासाठी निघाली होती. यावेळी दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या बुलेटने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या भीषण अपघातात करवा चौथच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करणाऱ्या त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला.
राजस्थानमधील अजमेर शहरातील फोयसागर रोडवर हा अपघात झाला. मनदीप कौन (30) असे मृत महिलेचे नाव आहे. मनदीप आणि तिचा पती गुरप्रीत यांनी करवा चौथच्या दिवशी पूजा आटोपून आपल्या मुलींसह बाहेर फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी ते दुचाकीवरून (स्कूटी) प्रवास करत असताना अचानक बुलेटने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की मनदीपची मान त्या बुलेटच्या चाकात अडकली.
पती गुरप्रीतने महिलेला त्याच अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालात पोहोचेपर्यंतच तिचा मृत्यू झाला. या अपघातात पती गुरप्रीत आणि दोन्ही मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच ख्रिश्चन गंज पोलीस स्थानकातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्केयात आला आहे. या भयंकर अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे.