
विरारमधील एका इमारतीला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत दीप प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावरील सदनिका जळून खाक झाली. यामध्ये तिघे होरपळले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे. अखिलेश विश्वकर्मा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली.
विरार पूर्वेच्या मामानगर परिसरात अरुण दीप प्लाझा इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील अखिलेश विश्वकर्मा यांच्या सदनिकेत शनिवारी रात्री साडेबारा वाजता आगीचा भडका उडाला. आग आणि धुराचे लोट बाहेर येताच बाजूच्या सदनिकाधारकांनी या घटनेची माहिती वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत अखिलेश विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
आग लावली की लागली?
अखिलेश विश्वकर्मा यांनी स्वतःच घरात आग लावल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कर्जबाजारी झाल्याने त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. यात त्यांना वाचवण्यासाठी गेलेले अन्य दोन गंभीर जखमी झाले.


























































