Ratnagiri News – मिठबांव-तांबळडेग किनारपट्टीवर आगीचे तांडव; जैवविविधतेचे नुकसान, MTDC चे कोट्यवधींचे ‘बीच कॉटेजेस’ धोक्यात!

देवगड तालुक्यातील मिठबांव आणि तांबळडेग सीमेवरील समुद्रकिनारी असलेल्या सुरुच्या बनाला भीषण आग लागली आहे. या आगीत निसर्गासह सरकारी मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या, मात्र अद्याप उद्घाटनही न झालेल्या बीच कॉटेजेसना आगीमुळे धोका निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी तांबळडेग येथील केरकर यांच्या बागेत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचे वृत्त समजताच मिठबांव ग्रामपंचायतीचे सरपंच भाई नरे यांनी तातडीने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र बुधवारी दुपारच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढल्याने आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केले. देखभालीअभावी या समुद्रकिनाऱ्यावरील कॉटेजेसना आधीच वाळवी लागून त्यांची पडझड सुरू झाली होती त्यातच आता आगीचे संकट उभे राहिले असून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला हा प्रकल्प उद्घाटनापूर्वीच उद्ध्वस्त होणार की काय? प्रशासनाच्या या अनास्थेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या आगीचा सर्वाधिक फटका येथील जैवविविधतेला बसला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सुरुच्या बनात असलेल्या अनेक पक्ष्यांची घरटी आगीत जळून खाक झाली आहेत. ही आग विझवण्यासाठी मिठबांव आणि तांबळडेग दोन्ही गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेऊन स्वतःहून प्रयत्न करत आहेत. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पुन्हा पाचारण करण्यात आले असून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.