राजस्थानच्या चुरूमध्ये वाळूचे तुफान, भरदिवसा दाटला काळोख अन् काही वेळात पाऊसही बरसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या सीमावर्ती भागात श्रीगंगानगर आणि चुरू जिल्ह्यांत शनिवारी भरदुपारी अचानक वातावरण बदलले. यामुळे भरदुपारी रात्र झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. अवकाश वाळूचे महाकाय तुफान उठल्याने शहरात अंधार पसरला होता. वाळूच्या तुफानाने सूर्यही झाकोळला गेला होता.

वाळूचे तुफान इतके दाट होते की बघता बघात सर्वत्र काळोख दाटला. आणि दृश्यमानता शून्यावर पोहोचली. यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. वाहनं जागेवरच थबकली आणि चालकांना लाइट्स सुरू करावी लागली. हे वाळूचे तुफान सामान्य नव्हते, असे हवामान विभाग आणि स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात आले. या तुफानाचा वेग हा 70 किमी प्रतितास वेग इतका नोंदवला गेला.

वाळूच्या तुफानाने ३० मिनिटं घोंगावत होते. यामुळे नागरिकांना दारे-खिडक्या बंद करून घरातच राहावं लागलं. वाळूचे तुफान थांबताच वातावरणात पुन्हा मोठा बदल झाला. वाळू खाली बसताच ढग दाटले आणि काही ठिकाणी जोरदार तर काही हलका पाऊस बरसला. तुफान आणि अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील ४५ डीग्री सेल्सिअसच्या वर गेलेला पारा खाली आला. यामुळे उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तुफान आणि अवकाळी पावसामुळे तापमान ८ अंशांची खाली आल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.