हा तर बंगाली अस्मितेचा अपमान, प्रजासत्ताक दिन संचलनात मातंगिनी हाजरा यांच्या नावाचा अपभ्रंश झाल्याने तृणमूल काँग्रेसचा तीव्र संताप

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान राष्ट्रीय प्रसारणावर समालोचकाकडून स्वातंत्र्यसैनिक मातंगिनी हाजरा यांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्यात आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमधील या स्वातंत्र्यसैनिकेचे नाव जाहीर करताना ‘मातंगिनी’ऐवजी ‘मंतागिनी’ असा अपभ्रंश करण्यात आला. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया देत हा प्रकार केवळ भाषिक चूक नसून बंगालच्या इतिहास आणि अस्मितेचा अवमान असल्याचा आरोप केला. पक्षाने मातंगिनी हाजरा यांचा उल्लेख ‘शहीद’ म्हणून केला.

मातंगिनी हाजरा यांचा 1942 मध्ये ‘छोडो भारत’ चळवळीदरम्यान तामलूक पोलीस ठाण्यावर ताबा मिळवण्यासाठी स्वयंसेवकांचे नेतृत्व करत असताना ब्रिटिश राजवटीच्या पोलिसांनी गोळ्या झाडून मृत्यू झाला होता. महात्मा गांधी यांच्या विचारांवर ठाम श्रद्धा असल्याने त्यांना ‘गांधीबुडी’ असेही संबोधले जात होते. तृणमूल काँग्रेसने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “भाजप ‘परिवर्तन’ची घोषणा करतो; पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ आमची ओळख, आमचा सन्मान आणि आमचे हक्क यांवर बंदी घालणे असा आहे.” आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘परिवर्तन’च्या घोषणेवर टीका करताना, या अपभ्रंशातून बंगालच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाकडे होत असलेले दुर्लक्ष स्पष्ट होते, असा आरोपही पक्षाने केला.

तृणमूल काँग्रेसने पुढे म्हटले की, “हातात तिरंगा घेऊन ब्रिटिशांच्या गोळ्यांना सामोरे गेलेल्या शहीद मातंगिनी हाजरा यांचे नाव संचलनात बेदरकारपणे चुकीचे उच्चारले जाणे ही जिभेची चूक नाही; हा एक पद्धतशीर प्रकार आहे—बंगालच्या प्रतीकांचा अपमान करणे, इतिहास विकृत करणे आणि आमच्या शहीदांचा अवमान करणे.” तसेच, “बंगालविरोधी शक्तींना देशासाठी बलिदान दिलेल्यांविषयी साधी माहिती ठेवण्याचीही तसदी नाही; हा अपमान अपघाती नसून वैचारिक आहे,” अशी घणाघाती टीकाही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणावर केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.