गणितज्ञ डॉ.व्ही.एल.देशपांडे यांचे निधन

ज्येष्ठ गणितज्ञ आणि गणिताचे निवृत्त विद्यार्थीप्रिय प्रा. डॉ. व्ही. एल. तथा विश्वनाथ लक्ष्मण देशपांडे यांचे पुण्यात नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. औंध स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. देशपांडे यांनी जळगाव जिल्हय़ात अमळनेरमधील प्रताप महाविद्यालयात 35 वर्षे तसेच पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात काही वर्षे गणिताचे अध्यापन केले. इंदूर विद्यापीठाने त्यांना गणितामधील संशोधनासाठी पीएच.डी. प्रदान केली होती. गणित विषयावर त्यांनी लिहिलेली पाठय़पुस्तके महाराष्ट्रातील काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत त्यांचे संशोधन निबंध प्रकाशित झाले. आंतरराष्ट्रीय गणित संस्थांच्या प्रबंध परीक्षण समित्यांवर त्यांनी अनेक वर्षे काम केले.