
आज स्वातंत्र्यदिन, उद्या गोपाळकाला आणि परवा हक्काचा रविवार.. लागोपाठ तीन दिवस सुट्ट्या आल्याने हजारो पर्यटकांनी भल्या सकाळी माथेरानची वाट धरली. मात्र दुपारपर्यंत वाहनतळ ओव्हरपॅक झाल्याने वाहनचालकांनी आपल्या गाड्या थेट भररस्त्यात पार्क केल्या. आधीच निमुळता रस्ता त्यात दुतर्फा गाड्या यामुळे माथेरान घाटात ट्रॅफिकचा ‘काला’च झाला. दस्तुरी नाका ते वॉटर पाइपलाइनपर्यंत मुंगीलाही शिरायला जागा राहिली नाही इतकी कोंडी झाल्याने असंख्य पर्यटकांना आनंदाचे लोणी न मटकवताच आल्या पावली घरी परतावे लागले.
एक्स्प्रेस वेवर पाच किमी रांगा
खालापूर : सलग आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन अनेकांनी देवदर्शन, तर काहींनी लोणावळा गाठण्याचा बेत आखला खरा. मात्र आज एक्स्प्रेस वेवर पुणे लेनवर पाच किमीच्या वाहनांच्या तुफान रांगा लागल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. बोरघाटात 50 च्या आसपास वाहनांचे इंजिन गरम झाल्याने ती बंद पडली, तर काही वाहनांच्या क्लज प्लेट गेल्याने खोपोली बायपास, आडोशी बोगदा एचओसी ब्रीज, अमृतांजन पूल तसेच जुन्या महामार्गावरील शिंग्रोबा मंदिर, अंडा पॉइंट अशा ठिकाणी वाहने बंद पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडली.
घाटातील शांतता भंग पावली
घाटात वाहनांची कासवगती, हॉर्नचा आवाज आणि रस्त्याच्या कडेला पसरलेली गर्दी यामुळे घाटातील शांतता आज भंग पावली होती. पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याऐवजी गाडीतच तासन्तास बसून राहावे लागले. लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागला, मुंबई, ठाणे परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही या कोंडीचा फटका बसला असून त्यांची माथेरानची सहल अपूर्ण राहिली.