
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) उत्पादन व विक्रीवर घातलेल्या बंदीविरोधात ‘मॅकडॉवेल रम’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. “आम्ही तळीरामांची फसवणूक करत नाही,” असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
पुण्यातील बारामती येथे या रमचे उत्पादन होते. रमच्या बाटलीवर फ्लेवर (चव) व वयोमर्यादेची नोंद नाही, असे कारण देत एफएसएसएआयने या रमच्या विक्रीवर बंदी आणली होती. सध्या स्टॉकमध्ये असलेल्या रमची विक्री करता येईल, मात्र त्यावर फ्लेवरची नोंद असायलाच हवी, अशी अट प्राधिकरणाने घातली आहे. ही कारवाई बेकायदेशीर आहे, कारण एफएसएसएआयच्या एका अधिकाऱ्याने ही कारवाई केली असून, त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे ही बंदी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
“नियमानुसारच आम्ही रमचे उत्पादन करतो. फ्लेवरची नोंद असावी असा कोणताही नियम नाही. आमच्या रममध्ये कोणताही दोष नाही; तरीदेखील आमची बाजू ऐकून न घेताच ही कारवाई करण्यात आली,” असा आरोप याचिकेत केला आहे.
आरोग्यासाठी हानिकारक नाही “आमची रम मानवी शरीरासाठी हानिकारक आहे, असा कोणताही निष्कर्ष कारवाईच्या अहवालात नोंदवलेला नाही,” असेही याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.




























































