मेरठमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरुणाने बुधवारी ऑनलाईन पनीर रोल ऑर्डर केला होता. मात्र तो रोल खाल्ल्यानंतर तो एग रोल असल्याचे लक्षात आले आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तो प्रचंड संतापला आणि हे प्रकरण पोलिसापर्यंत पोहोचले.
तक्रारदार तरुण नितीश दिल्ली येथील विश्व एन्क्लेव्ह येथील कँट येथील एका मंदिरात सेवक आहे. बुधवारी रात्री नितीश याने ऑनलाईन पनीर रोल ऑर्डर केले. ऑनलाईन डिलिव्हरी करणारी कंपनी ‘बाप ऑफ रोल्स रेस्टॉरेण्ट’ येथून मागवले होते. नितीशने पार्सल खोलून पनीर रोल खाल्ले मात्र त्यात त्याची चव वेगळी लागली. त्यानंतर त्याने नीट पाहिले असता तो पनीर रोल नसून एग रोल असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नितीश दोन साथीदारांसोबत रेस्टॉरेण्टमध्ये पोहोचला आणि त्याने एकच गोंधळ घातला. माहिती मिळाल्यानंतर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते योगेश ठाकूर, शिवा कश्यप, आयुष अग्रवाल, रक्षित मित्तल आणि अन्य रेस्टॉरेण्टपर्यंत पोहोचले आणि धर्म भ्रष्ट केल्याचा आरोप लावत कारवाई करण्याची मागणी करु लागले.
अखेर घटनास्थळी पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण शांत केले. पोलिसांनी चौकशी केली असता रेस्टॉरेण्टच्या संचालकांनी पार्सलची अदलाबदली झाल्याचे सांगितले. पोलीस शंशांक द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, रेस्टॉरेण्टमधील गोंधळाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते. पिडीत तरुणाची तक्रार मिळाली असून तपासानंतर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.