Meesho ला मोठा झटका! आयकर विभागाकडून दीड हजार कोटींच्या कर वसुलीची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘मीशो’ला (Meesho) आयकर विभागाने मोठा दणका दिला आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या आणि उत्तम दर्जाच्या वस्तू विकणाऱ्या Meesho ला वर्ष 2023-24 साठी सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या कर वसुलीची नोटीस बजावली आहे. 7 मार्च रोजी कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फायलिंगद्वारे ही माहिती दिली. डिमांड इनकम टैक्स अॅक्ट 143(3) आणि 156 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये व्याजासह एकूण 1,499.73 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान Meesho ने आता या नोटिसीवर आपले उत्तर दिले आहे. यामध्ये कंपनीने स्पष्ट केले आहे की, ते या मागणीशी सहमत नसून या असेसमेंट ऑर्डरला कायदेशीररित्या आव्हान देणार आहेत. कंपनीच्या मते, त्यांच्याकडे या विरोधात ठोस कायदेशीर बाजू असून या निर्णयामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर किंवा दैनंदिन कामकाजावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे, अशाच प्रकारची नोटीस कंपनीला मागील मूल्यांकन वर्षातही (२०22-23) मध्येही मिळाली होती, ज्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने 17 एप्रिल 2025 रोजी अंतरिम स्थगिती दिली आहे.

2015 मध्ये आयआयटी पदवीधर विदित आत्रे आणि संजीव बरनवाल यांनी Meesho ची सुरूवात केली. ही बंगळुरू स्थित कंपनी प्रामुख्याने छोट्या विक्रेत्यांवर आणि दुसऱ्या-तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते. व्हॅल्यू कॉमर्स क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलेल्या या कंपनीने आता या कर वादात कायदेशीर लढा देण्याचे ठरवले आहे. कंपनी आपले कामकाज सुरळीत सुरू ठेवणार असून, योग्य कायदेशीर मार्गांचा अवलंब करून कंपनीचे रक्षण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.