लोकल प्रवाशांचे उद्या मेगाहाल! मध्य रेल्वेवर पाच तासांचा ब्लॉक; हार्बर, ट्रान्स हार्बरची सेवा बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेतला आहे. अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान तसेच ट्रान्स हार्बरवर पनवेल ते ठाणेदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे.

ब्लॉक कालावधीत मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. तसेच घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा येथे थांबतील. हार्बरवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ब्लॉक असेल.