
मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. तांत्रिक कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेवर विद्याविहारआणि ठाणे स्थानकादरम्यान, तसेच हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गिकेत बदल करण्यात आला आहे.
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 8.00 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. तर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल जाणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल, वाशी, बेलापूरहून सीएसएमटीला येणाऱ्या लोकल फेऱ्या सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिरा धावतील. एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाऊन मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे येथे पुन्हा पाचव्या मार्गिकेवर वळवण्यात येतील.