विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन तर मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विकेण्डला प्रवास करताना रेल्वेचे वेळापत्रक बघून बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र शनिवारी मध्यरात्री 12.20 ते पहाटे 4 या वेळेत वसई रोड ते भाईंदर या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल.