मध्य-हार्बर लाईनवर उद्या मेगाब्लॉक; एमपीएससी, मॅटच्या परीक्षार्थींचे हाल

मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘क’ मुख्य परीक्षा तसेच एसबीआय क्लार्क पद आणि मॅटची परीक्षा होणार आहे. त्यामुळे सलग दुसऱया रविवारी विविध परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचा रेल्वे प्रवासात खोळंबा होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य प्रवाशांचीही गैरसोय होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने राज्य आणि पेंद्रीय पातळीवरील परीक्षांच्या दिवशी मेगाब्लॉक रद्द करावा, अशी मागणी जोर धरत आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते 15.40 वाजेपर्यंत तसेच हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 16.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.