रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही उशिराने

रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱया मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा होणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी रेल्वे प्रवास करणे आवश्यक असल्यास लोकलचे वेळापत्रक तपासण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3 यावेळेत मेगाब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱया जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱया रद्द होणार असून काही विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंच ब्लॉक घेण्यात येईल. यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱया अप-डाउन लोकल रद्द होतील, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे-गोरेगावदरम्यान धावणाऱया लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱया वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच असतील. पुन्हा याच स्थानकातून लोकलचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.