क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या हिंदुस्थानी चाहत्यांसाठी बुधवार सुपरहिट ठरणार आहे. एकीकडे महिला टी-20 विश्वचषक तर दुसरीकडे टीम इंडियाच्या पुरुष संघाचा बांगलादेशविरुद्ध दुसरा टी-20 सामना. दोन्ही सामने एकाच दिवशी असल्यामुळे चाहत्यांना पुरुष आणि महिला संघाकडून षटकार आणि चौकारांची चौफेर फटकेबाजी पहायला मिळणार आहे.
दुबईत सुरू असणाऱ्या महीला टी-20 विश्व चषकामध्ये टीम इंडियाचा तिसरा सामना बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) श्रीलंकाविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाला साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात न्युझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत टीम इंडियाने पाकिस्तानला धुळ चारली आणि विश्वचषकातील पहिला विजय साजरा केला. तोच धुवाँधार खेळ कायम ठेवत टीम इंडिया उद्या श्रीलंकाविरुद्ध लढण्यासाठी सांयकाळी 7.30 वाजता मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाच्या पुरुष क्रिकेट संघाची बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात ग्वाल्हेरमध्ये टीम इंडियाने 7 विकेटने बांगलादेशचा फडशा पाडला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या टी-20 सामना जिंकल्यामुळे उद्या होणारा दुसरा टी-20 सामना जिंकून मालिका विजय साजरा करण्याची टीम इंडियाला संधी आहे. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे.