तू पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे…; मित्र उडवायचे खिल्ली, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

“तू पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे”, असं म्हणत गावातील मित्र मंडळी संतोषची (बदललेलं नाव) वारंवार खिल्ली उडवत होते. त्यामुळे संतापलेला संतोष रागाच्या भारात थेट दुमजली घराच्या छतावर जाऊन ठाण मांडून बसला. छतावरून उडी मारत जीव देण्याची धमकी देऊ लागला. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बऱ्याच वेळांनी तो छतावरून खाली आला.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील सिरौली पोलीस स्टेशन परिसरातील 25 वर्षांच्या संतोषला गावातील मित्र मंडळी पागल म्हणून चिडवत असतं. त्यामुळे त्याच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड राग होता. अशातच 40 दिवसांपूर्वी त्याचे माधुरीशी (बदललेलं नाव) लग्न झालं. माधुरी दिसायला सुंदर होती. त्यामुळे गावातील तरुण संतोषला माधुरीच्या सुंदरतेवरून चिडवायला लागले. “तुझी बायको सुंदर आहे, तू पागल आहेस”, असं वारंवार त्याची खिल्ली उडवू लागले त्यामुळे संतोषला राग अनावर झाला आणि त्याने बुधवारी (28 मे 2025) गावातील दुमजली घराच्या छतावर जाऊन ठाण मांडलं आणि रडत रडत जीव देण्याची धमकी देऊ लागला. संतोषला छतावर पाहून गावातील नागरिक चांगलेच घाबरले आणि त्यांनी त्याला खाली येण्याची विनंती केली. कुटुंबातील सदस्यांसह सर्वांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संतोष कोणाचच ऐकायला तयार नव्हता.

पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती योग्यरित्या हाताळत संतोषला चांगल्या पद्धतीने समजावलं आणि त्याला छतावरून खाली आणण्यात यश आलं. त्यानंतर त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.