आभाळमाया – उल्कांची आरास आणि आघात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक [email protected]

1998 मध्ये नोव्हेंबरच्या मध्याला होणारा सिंह राशीच्या पार्श्वभूमीवरचा ‘लिओनिड’ उल्कावर्षाव पाहण्याचं ‘भाग्य’ ज्यांना लाभलं त्यात आम्ही काही ‘खगोल’ मंडळी होतो. सर्वच उल्कावर्षावांचे वार्षिक दिनांक आधीच ठरलेले असतात. तसाच ‘लिओनिड’चा काळ साधारण 15 ते 18 नोव्हेंबर असा असतो. 1998 मध्ये आपल्याकडून हा उल्कावर्षाव दिसण्याची सर्वात अनुकूल स्थिती होती. साहजिकच दोन-तीन हजारांची गर्दी होणार म्हणून आदल्या दिवशी आम्ही ‘खगोल मंडळा’चे काही कार्यकर्ते पूर्वतयारीसाठी वांगणीला पाटोळे यांच्या ‘फिल्ड’वर पोहोचलो आणि रात्री 11 च्या सुमारास अवकाशातून सिंह ‘राशीतून’ उल्कांचा पाऊसच सुरू झाला. कुठल्या दिशेला पाहावं याचा संभ्रम पडावा अशी ही अवकाशी आतषबाजी (आतिशबाजी) होती! ताशी 200 उल्का सरासर पृथ्वीकडे खेचल्या जात होत्या. मोठमोठे अग्निगोलक (फायरबॉल) आकाश उजळत होते. दोन-तीन तासांची ही अवकाशी दिवाळी आयुष्यभर स्मरणात राहणारी. खूप आनंदात आम्ही दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची मांडणी केली. दुसऱ्या दिवशी वांगणीत सुमारे 10 हजार ‘प्रेक्षक’ जमले!

सर्वांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं. त्या सर्वांना आम्ही कालच्या तेजस्वी पर्वाची कहाणी सांगत होतो, परंतु निर्हेतुक निसर्गाची लहर फिरली. त्याला आमच्या आनंद सोहळय़ाशी काय देणं-घेणं? रात्री साडेदहाच्या सुमारास आकाश काळोखलं. धो धो पाऊस सुरू झाला. नोव्हेंबरातला हा अवकाळी पाऊस आमच्या कार्यक्रमाची अगदी वाईट अवकळा करून गेला. सूज्ञ प्रेक्षकांनी मोलाचं सहकार्य केलं. आमच्या दृष्टीने एक ‘ग्रॅण्ड फ्लॉप शो’ चित्रित झाला. कारण त्या कार्यक्रमाचं व्हिडीओ चित्रण करण्याची सज्जता आम्ही ठेवली होती.

हे वारंवार आठवतं कारण वर्षातून अनेकदा अनेक राशींच्या पार्श्वभूमीवर दिसणारे, विविध धूमकेतूंनी ‘मागे’ सोडलेल्या दगड-धुळीच्या, पृथ्वीकडे खेचलं जाण्याच्या आणि वातावरणाशी घर्षण होऊन जळणाऱ्या-उजळणाऱया उल्कांचे कार्यक्रम ठरल्या वेळी होत असतात.

हर्क्यूलर पिंवा शौरी आणि लायरा पिंवा स्वरमंडल या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ‘लायरिड’ हा उल्का वर्षाव 15 ते 29 एप्रिल या काळात दिसतो. आता तो सुरू झालाय. आज-उद्याच्या रात्री त्याचा ‘पिक’काळ (बहर) असणार आहे. या ‘लायरिड’ उल्कावर्षावाची नोंद अगदी इसवी सन पूर्व 687 पासून आढळते. हा उल्कावर्षाव ज्या धूमकेतूने मागे सोडलेल्या धूळ, दगड द्रव्यामुळे होतो त्याचं नाव ‘थॅचर’ असं आहे. हॅलीचा धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो ही आता अगदी ‘पाठ’ झालेली गोष्ट, परंतु ‘थॅचर’सारखे ‘लॉन्गटर्म’ धूमकेतू 200 ते 10,000 वर्षांनी परत सूर्यमालेकडे येत असतात. स्वतः ‘थॅचर’चा आवर्तनकाळ 415 वर्षांचा आहे.

आकाश काळोख, निरभ्र, प्रकाश, धूळ, प्रदूषण तसंच चंद्रप्रकाशविरहित असेल तर अशी वेळ उल्कावर्षाव पाहण्यासाठी अत्यंत अनुकूल असते. या वेळी याच प्रकारची ‘फेव्हरेबल पंडिशन’ आहे असं म्हटलं जातं. मात्र त्यासाठी रात्र उजळणाऱया ‘दिवाळी’च्या शहरी भागापासून दूर दाट काळोख असणाऱया जागी जावं लागेल एवढं खरं. ते जमलं तर ताशी किमान दहा-पंधरा उल्का आणि काही ‘फायरबॉल’सुद्धा दिसू शकतात. कारण चंद्रकोर मध्यरात्रीपूर्वीच मावळणार असून मध्यरात्रीपासून ‘लायरिड’ उल्कावर्षाव चांगला दिसू शकेल. पहाटेपर्यंत त्याचा आनंद घेता येईल.

उल्का पडते आणि क्षणात जळून नष्ट होते. त्यामुळे पडत्या उल्केचा पह्टो घेणे खूप कठीण असते. पूर्वी पॅमेऱयाचं अॅपॅर्चर उघडं ठेवून वाट पाहत बसलं तर क्वचित असा पह्टो घेता यायचा. आता मोबाईल कॅमेऱ्यामुळे व्हिडीओसुद्धा घेतला जातो, परंतु आमचे एक सभासद अभिजित यांनी 1998 मधल्या ‘लिओनिड’ उल्कावर्षावाच्या वेळी एका तेजस्वी कोसळत्या उल्केचा पह्टो फिल्मवर घेतला आहे!

पृथ्वीवर दिवसासुद्धा लाखो छोटय़ा उल्का कोसळत असतात. वातावरणाच्या घर्षणाने त्यांची उजळतानाच राख होत असल्याने त्या भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाहीत. मात्र काही मोठय़ा आकाराच्या उल्का पिंवा अशनी जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळतात, तेव्हा मात्र ते उत्पात करतात. आपल्या महाराष्ट्रातल्या लोणार तळय़ाची निर्मिती अशनी आघाताने झाली होती हे तर जगजाहीर आहे. 1910 मध्ये रशियात तुंगुष्का येथे प्रचंड अशनी कोसळून मोठे जंगल जळून भस्मसात झाले. काही वेळा माणसांना, सजीवांना छोटय़ा अशनींचा फटका बसून इजा झाल्याचीही उदाहरणं आहेत.

अगदी अलीकडे अमेरिकेतल्या ओहायो राज्यात एका 6 मीटर व्यासाच्या आणि 6800 किलो वजनाच्या एका अशनीने पृथ्वीवर कोसळताना निर्माण केलेल्या प्रचंड अग्निगोलक (फायरबॉल) अनेकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केला. 17 मार्च 2026 च्या रात्री 9 च्या सुमारास हा 7 टन वजनाचा अशनी (महाउल्कापाषाण) ताशी 45000 किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे खेचला गेला. ‘लेक एरी’ या सरोवरावर हे विश्लेषण दृश्य दिसलं. या अशनीचे झालेले तुकडे मेडिना प्रांतात पडले असावेत. त्याच्या आवाजाने तिथले रहिवाशी मात्र प्रचंड घाबरले. अर्थात ही क्वचित घडणारी आघाती गोष्ट. एरवी उल्कावर्षाव जरूर पाहावा. त्याची आरास विलोभनीयच असते.