Mumbai Rain : मुंबईत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता, पुढील दोन तास येल्लो अलर्ट

गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. वीजांच्या कडकडाटासह पावसाची रिमझिम सुरूच आहे. सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून पुढील तीन-चार तासात मुंबई आणि उपनगरात वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तसेच मुंबईत काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय पुढील 48 तासात मुंबई आणि उपनगरात हलक्या व मध्यम पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून मुंबईत येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह देशातील अनेक भागांना परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता

आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या प्रभावाखाली कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे येत्या 24 तासांत श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टी आणि नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि किनारपट्टी भागात ताशी 80 किमी वेगाने वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.