
मुलुंड येथील मेट्रो-4 मार्गिकेचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी एमएमआरडीएला दिले. गेल्या महिन्यात येथील मेट्रो खांबाचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला होता.
14 फेब्रुवारीला ही घटना घडली. मेट्रो-4 मार्गिकेचा स्लॅब कोसळून एका रिक्षा व कारवर पडला. यात एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मेट्रो मार्गिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा सर्व मेट्रो मार्गिकांचे सुरक्षा ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने एमएमआरडीएला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ऍड. रुजू ठक्कर यांनी दाखल केली आहे. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. ही दुर्दैवी घटना घडून गेली आहे. प्रत्येक घटनेसाठी न्यायालयाचे दार ठोठावले जाऊ शकत नाही. तरीदेखील या प्रकरणी सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश आम्ही एमएमआरडीएला देत आहोत. जेणेकरून याचिकाककर्त्याचा ही जनहित याचिका दाखल करण्याचा उद्देश सफल होईल, असे नमूद करत खंडपीठाने ही सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली.
























































