भुयारी मेट्रो स्थानकांवर नाव कोरण्यासाठी नामांकित कंपन्यांमध्ये स्पर्धा

देशातील पहिली भुयारी मेट्रो रेल्वे असलेल्या मेट्रो-3 प्रकल्पातील स्थानकांच्या नामकरणाचे अधिकार मिळवण्यासाठी नामांकित कंपन्यांची स्पर्धा लागली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मार्ग असलेल्या मेट्रो-3 वर 18 स्थानके आहेत. त्यांच्या नावाचे अधिकार मिळवण्यासाठी 28 कंपन्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. सर्वाधिक कंपन्यांनी बीकेसी मेट्रो स्थानकाला पसंती दिली आहे.

मुंबई मेट्रो रेल महामंडळ (एमएमआरसी) हे अधिकार विकणार आहे. बीकेसी स्थानकासाठी 12 अर्ज आले आहेत. दुसऱ्या क्रमांकाची पसंती दादर आणि एअरपोर्ट टर्मिनल-2 या स्थानकांना मिळाली आहे.  तिकीट भाडय़ाव्यतिरिक्त मिळणारा महसूल एमएमआरसीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळे तिकिटाचे दर नियंत्रणात ठेवणे शक्य होईल असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी सांगितले. नामांकित कंपन्यांकडून यासाठी मिळालेला प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा आहे,  असे ते म्हणाले.

सरकारी, फायनान्स, एअरलाइन्स कंपन्यांचा समावेश

खासगी कंपन्यांबरोबरच सरकारी कंपन्यांकडूनही अर्ज आले आहेत. त्यात एलआयसी, इंडियन ऑईल, फायनान्स क्षेत्रातील एसबीआय, बँक ऑफ बडोदा, यूटीआय, कोटक, आयडीएफसी फर्स्ट, एचएसबीसी आणि एअरलाइन्स क्षेत्रातील इंडिगो, स्पाइसजेट या कंपन्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय जेएसडब्लू, ग्लॅक्सो स्मिथलाइन, टाइम्स ग्रुप, ब्लॅकस्टोन, फिनिक्स मिल्स, पिरामल, ओबेरॉय, डीबी रिऍल्टी या कंपन्यांनी मेट्रो स्थानकांच्या नामकरणाचे अधिकार मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या