वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी दिवसेंदिवस वाढतेय. बदलत्या काळात दर्जेदार घरांची निर्मिती व परवडणारे दर यांची सांगड घालण्याचे कौशल्य म्हाडाकडे आहे. आज म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असल्याचे बोलले जात आहे. घरांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हाडा मुख्यालयात संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक या प्रवर्गातून सद्यस्थितीत म्हाडामध्ये सेवेत असलेल्या 22 कर्मचाऱयांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयस्वाल म्हणाले, म्हाडा लोकाभिमुख कार्यालय आहे. त्यामुळे म्हाडा कार्यालयास भेट देणाऱया नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी संवेदनशील असणे महत्त्वाचे आहे. म्हाडाच्या लोकशाही दिन कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक रहिवाशांच्या तक्रारींचे स्वरूप लक्षात आले आहे. त्यादृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
म्हाडा अर्जदारांची डीजी लॉकरच्या कटकटीतून सुटका
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना अर्जदारांना डीजी लॉकरच्या माध्यमातून कागदपत्रे सादर करावी लागत आहे. मात्र, बहुतांश अर्जदार सामान्य असून त्यांना डीजी लॉकर खाते कसे काढावे, त्याचा वापर कसा करावा याबाबत माहिती नाही. त्यामुळे अर्जदारांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर म्हाडाने डीजी लॉकरच्या माध्यमातून कागदपत्रे सादर करण्याची अट शिथिल करून जुन्या पद्धतीने कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.